पाणीपुरवठा मंत्र्यांचा मुंबईत दोनशे कोटींचा बंगला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:54 AM2017-10-16T00:54:20+5:302017-10-16T00:54:20+5:30

पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर व त्यांच्या स्वीय सहायकाने मुंबईतील मलबार हिलमध्ये एका इंग्लंडस्थित भारतीयाचा दोनशे कोटींचा बंगला गैरमार्गाने खरेदी केल्याचा आरोप जालना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी रविवारी जालना येथे पत्रकार परिषदेत केला

 Water Supply Minister's 200 crores bungalow in Mumbai! | पाणीपुरवठा मंत्र्यांचा मुंबईत दोनशे कोटींचा बंगला !

पाणीपुरवठा मंत्र्यांचा मुंबईत दोनशे कोटींचा बंगला !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर व त्यांच्या स्वीय सहायकाने मुंबईतील मलबार हिलमध्ये एका इंग्लंडस्थित भारतीयाचा दोनशे कोटींचा बंगला गैरमार्गाने खरेदी केल्याचा आरोप जालना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी रविवारी जालना येथे पत्रकार परिषदेत केला. विकासाच्या नावाखाली विविध योजनांच्या माध्यमातून लोणीकरांनी कोट्यवधींची बेनामी संपत्ती गोळा केली असून, या प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी जेथलिया यांनी केली.
माजी आ. जेथलिया म्हणाले की, राजकीय विरोधकच राहू नये म्हणून वैयक्तिक द्वेषातून आपल्यासह कुटुंबातील सदस्यांवर राजकीय सूड उगवला जात आहे. पालकमंत्री लोणीकर यांनी केलेल्या अनेक तक्रारींची स्थानिक प्रशासनासह मंत्रालयीन स्तरावरही चौकशी करण्यात आली. त्यातून सर्व अहवाल आपल्या बाजूने आहेत. असे असताना विविध प्रकरणांत आपल्याला गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकशाहीच्या नावाखाली ही सरंजामशाही असून विरोधात आवाज उठविणा-यास संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार दिली असून, यावर योग्य तो निर्णय घेण्याची विनंती केली आहे. गत तीन वर्षांत पालकमंत्री लोणीकर यांनी कार्यकर्त्यांच्या नावावर गुत्तेदारी सुरु केली आहे. मंठा-परतूर मतदार संघात चार-चार हेडखाली एकच जलयुक्त शिवारचे काम करण्यात आले आहे. तेही निकृष्ट दर्जाचे झाले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जी कामे केली जात आहेत, त्यामध्ये लोणीकर पिता-पुत्र कार्यकर्त्यांच्या नावावर लोणीकर यांनी जेसीबी व इतर यंत्रणा जुंपवली आहे. परतूर व मंठा तालुक्यात दर सहा महिन्यांमध्ये पोलीस अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिका-यांच्या बदल्या केल्या जात आहेत. याचा विकास कामांवर परिणाम होत असून, चांगल्या अधिका-यांना काम करू दिले जात नाही. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही जेथलिया यांनी केली. तसेच मलबारहिल बंगला परिसरात यशवंत कुलकर्णी व दिगंबर सस्ते यांच्या नावे मंत्री लोणीकर यांनी मालमत्ता खरेदी केली असून या मुखत्यारनाम्याची प्रत आपल्याकडे असल्याचा दावा जेथलिया यांनी केला.
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची लेखी मागणी मूळ मालक फिरोज दुगन राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडे यांच्याकडे केली असल्याचे जेथलिया यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस काँग्रेसचे मंठा तालुकाध्यक्ष नीळकंठ वायाळ, जिल्हा उपाध्यक्ष किसनराव मोरे आदी उपस्थित होते.




जेथलियांचे आरोप राजकीय द्वेषातून
परतूर मतदारसंघामध्ये आपल्या नेतृत्त्वात विविध विकास कामे सुरू आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी योजनांमधील १७६ गावांच्या २३४ कोटीच्या पाणी पुरवठा योजनेचे काम ३५ % पूर्ण झाले आहे. मतदार संघातील दोन मोठे रस्ते राष्ट्रीय महामार्गात मंजूर करून प्रगतिपथावर आहेत. विकासकामांमुळे आगामी काळात जेथलियांसाठी त्यांचे राजकीय भवितव्य अंधारमय दिसत असून आपल्याला आलेल्या अपयशा पोटी खोटे आरोप करीत आहेत. मुंबई येथील जमनादास मेहता लॉन साईड ६, मार्ग क्र.(५) २४२, मलबार हिल डी वॉर्ड, मुंबई -४००००६, या मालमत्तेशी आमचा व आमच्या कार्यालयाचा काहीही संबंध नाही. हा जाणीवपूर्वक चिखलफेक करण्याचा प्रयत्न असून या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा आम्ही विचार करीत आहे. सुरेशकुमार जेथलिया यांनी मानसिक संतुलन ढळू न देता आरोप करावेत, असा खुलासा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केला आहे.

Web Title:  Water Supply Minister's 200 crores bungalow in Mumbai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.