जुन्या शहराचा पाणीपुरवठा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:03 AM2021-04-25T04:03:21+5:302021-04-25T04:03:21+5:30
औरंगाबाद : जुन्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्हची दुरुस्ती केल्यानंतर शनिवारी सकाळी पाणीपुरवठा सुरळीत ...
औरंगाबाद : जुन्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्हची दुरुस्ती केल्यानंतर शनिवारी सकाळी पाणीपुरवठा सुरळीत झाला. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीचा एअर व्हॉल्व्ह पैठण रोडवरील ताहेरपूर जवळ गुरुवारी रात्री फुटला होता. त्यामुळे या जलवाहिनीचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी सकाळपासून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दरम्यानच्या काळात १४०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला जात होता, परंतु त्याला देखील मर्यादा आल्यामुळे या जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. दोन्हीही जलवाहिनीतून केला जाणारा पाणीपुरवठा बंद केल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवसाने पुढे ढकलले जाईल असे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले होते. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. त्यानंतर जायकवाडीहून टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा सुरु करण्यात आला. शनिवारी सकाळी शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे सुरळीत झाला. बहुतेक भागात पाणीपुरवठा झाला.
दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर शनिवारी ७०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील गळती बंद करण्याचे काम देखील करण्यात आले. ढोरकीन, ढाकेफळ फाटा आदी ठिकाणची गळती बंद करण्याचे काम करण्यात आले. पाणीपुरवठा बंद न करता ही कामे करण्यात आल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी कळविले आहे.