पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 10:23 PM2019-04-05T22:23:41+5:302019-04-05T22:23:56+5:30
सध्या आठ दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्यात यावा, यासाठी ग्रामपंचायतीकडून जिल्हाधिकारी व एमआयडीसी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वाळूज महानगर : एमआयडीसी प्रशासनाकडून अघोषित पाणी कपात करण्यात आल्यामुळे वाळूज गावातील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. सध्या आठ दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्यात यावा, यासाठी ग्रामपंचायतीकडून जिल्हाधिकारी व एमआयडीसी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आगामी दोन महिने भीषण टंचाईचे राहणार असल्याने प्रशासनाची परीक्षा ठरणार आहे.
वाळूज ग्रामपंचायतीला सहा महिन्यांपासून एमआयडीसीकडून पाणी पुरवठा सुरु केलेला आहेत. गावात एमआयडीसी प्रशासनाने पाणी पुरवठा सुरु केल्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला होता. ग्रामपंचायतीला दररोज एमआयडीसीकडून जवळपास १४ लाख लिटर पाणी मिळत असल्यामुळे गावात नळयोजनेद्वारे ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा सुरु केला होता. मात्र, २७ मार्चपासून एमआयडीसी प्रशासनाने अचानक पाणी कपात केल्याने गावातील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. आजघडीला गावात केवळ ६ लाख लिटरच्या आसपास पाणी मिळत असल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतीच्या तीन सार्वजनिक विहिरी व बोअरच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने आठ ते दहा दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा, यासाठी नागरिकाकडून ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केला जात असून पाणी प्रश्नाकडे पदाधिकारी गांभीर्याने लक्ष देत नसल्याची ओरड नागरिकांतून होत आहे.
वाढीव पाणी पुरवठ्यासाठी पत्रव्यवहार
गावातील पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन ग्रामपंचायती प्रशासनाने जिल्हाधिकारी व एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता यांच्याशी पत्रव्यवहार करुन पाणीकपात मागे घेण्याची मागणी केल्याचे सरपंच पपीन माने, उपसरपंच मनोज जैस्वाल, ग्रामविकास अधिकारी एस.सी.लव्हाळे यांनी सांगितले.
जारची मागणी वाढली
गावातील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडल्यामुळे नागरिकांना जारचे विकत पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. पाणीटंचाईमुळे जारच्या शुद्ध पाण्याला मागणी वाढली आहे. नियोजनाअभावी गावातील नागरिकांना कडक उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचा आरोप नागरिकातून होत आहे.