जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 01:21 PM2021-08-27T13:21:18+5:302021-08-27T13:22:18+5:30
Aurangabad Municipal Corporation News दुरुस्तीसाठी जलवाहिनी रिकामी करणे, दुरुस्तीनंतर जलवाहिनीमध्ये पाणी भरून घेणे यांसह इतर कामांसाठी साधारणत: १२ तासांचा कालावधी लागणार आहे.
औरंगाबाद : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या १२०० मि.मी. व्यासाची जलवाहिनीला गुरुवारी जायकवाडी पंपहाऊसजवळ गळती लागल्यामुळे दुरुस्तीसाठी जलवाहिनी शुक्रवारी दिवसभर बंद राहणार आहे. जलवाहिनीच्या बाजूलाच महावितरणचे उपकेंद्र आहे. गळतीतून उपकेंद्रात पाणी जाऊ शकते. त्यामुळे तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय महापालिका पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. दरम्यान, शुक्रवारी दिवसभर १२०० मि.मी.च्या जलवाहिनीवरून पाणीपुरवठा होणार नाही. ७०० मि. मी. व्यासाच्या एकाच जलवाहिनीने पाणीपुरवठा होईल. त्यामुळे संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवसाने पुढे ढकलले आहे.
दुरुस्तीसाठी जलवाहिनी रिकामी करणे, दुरुस्तीनंतर जलवाहिनीमध्ये पाणी भरून घेणे यांसह इतर कामांसाठी साधारणत: १२ तासांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे शहर व सिडको परिसराला शुक्रवारी पाणीपुरवठा होणार नाही. तसेच शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आलेला आहे. या १२ तासांत फारोळा फाटा येथील स्कावर व्हॉल्व्हमधील गळती दुरुस्त करणे, नक्षत्रवाडी एमबीआर येथील २ गळत्या दुरुस्त करणे, जालाननगर येथे २ एअर व्हॉल्व्हचे पाईप बदलणे तसेच रेल्वे क्रॉसिंगनजीक १४०० मिमी व्यासाच्या गुरुत्व वाहिनीवरील गळती बंद करणे ही कामे देखील केली जाणार आहेत. दोन जलवाहिन्यांंद्वारे शहराला जायकवाडी धरणातून १०० व ५६ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. त्यातील जायकवाडी येथील १०० दशलक्ष लिटर क्षमतेच्या योजनेचे नवीन पंपगृहानजीक वेल्डिंग निखळून मोठी गळती सुरू झाली आहे, असे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी सांगितले.