पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 11:33 PM2019-06-06T23:33:05+5:302019-06-06T23:33:30+5:30

शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले असून, नियोजन प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. एक दिवसाने पूर्ण शहराचे वेळापत्रक पुढे ढकलले आहे. त्यामुळे नागरिकांची तारांबळ होत आहे. सिडको-हडकोसाठी प्रशासनाने केलेले नियोजनही कागदावरच राहिले आहे.

The water supply schedule collapsed again | पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले

पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले

googlenewsNext
ठळक मुद्देएक दिवसाने पुरवठा पुढे ढकलला: सिडकोसाठी केलेले नियोजन पालिकेच्या आवाक्याबाहेर

औरंगाबाद : शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले असून, नियोजन प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. एक दिवसाने पूर्ण शहराचे वेळापत्रक पुढे ढकलले आहे. त्यामुळे नागरिकांची तारांबळ होत आहे. सिडको-हडकोसाठी प्रशासनाने केलेले नियोजनही कागदावरच राहिले आहे.
चार आणि सहा दिवसांआड नियमित पाणीपुरवठा होईल, असा दावा प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी केला होता. परंतु त्यात आता एक दिवसाचा खंड पडला आहे. सिडको-हडकोला तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा दावा महापौर आणि मनपा प्रशासनाने केला. मात्र, ती घोषणा हवेत विरली आहे. जायकवाडीने तळ गाठला असून, टंचाई नियोजनासाठी विभागीय प्रशासनाने एक महिन्यापूर्वी प्रस्ताव मागविला होता. मनपाने २ जून रोजी प्रस्ताव दिला. अतिरिक्त पंपिंगसाठी शासनाकडून निधी वेळेत मिळणे शक्य झाले असते. परंतु त्यावर मनपाने लक्ष दिले नाही. १५६ ऐवजी १३५ एमएलडी पाणी जायकवाडीतून उपसा होत असून, ११५ ते १२० एमएलडी पाणी शहराला मिळत आहे. परिणामी कमी वेळ पाणीपुरवठा आणि काही भागांत खंड देण्यात येत असल्याने नागरिक संतापले आहेत.
जायकवाडीच्या डाव्या कालव्यालगत पालिकेने ६ तरंगते जल उपसापंप बसविले. परंतु वीजपुरवठ्यातील अडचणींमुळे उपशावर परिणाम झाला. वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर त्या पंपांच्या विद्युत मोटारी जळाल्या. सध्या चार पंप बंद पडल्याची माहिती हाती आली आहे. परिणामी शहराला कमी पाणीपुरवठा होतो आहे.
एक दिवसाने वेळापत्रक पुढे
जायकवाडीतील पंपिंग स्टेशनवर बिघाड झाल्यामुळे एक दिवसाने पाणीपुरवठा वेळापत्रक पुढे ढकलले आहे. गुरुवारी एन-१२, एन -११, पुंडलिकनगर गजानननगर, ज्योतीनगर, एन- ७, उल्कानगरी, विश्वभारती कॉलनी, गारखेडा आदी भागांत पाणीपुरवठा करण्यात येणार होता. मात्र एक दिवसाचा खंड पडल्याने या भागांना शुक्र वारी पाणीपुरवठ्याचा दावा करण्यात येत आहे.
१५ कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव
सिडको-हडकोचा पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी एक्स्प्रेस वाहिनीवरील बायपास बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. जुने शहर, फारोळा जलशुद्धीकरण केंद्र, नक्षत्रवाडीतील एमबीआर दुरुस्तीच्या कामासाठी १५ कोटी रुपयांचा प्रस्ताव गुरुवारी स्मार्ट सिटी योजनेच्या एसपीव्हीच्या बैठकीत ठेवला. ज्युबिली पार्क येथे ३ कोटी १२ लाखांतून विविध कामे करणे, कोटला कॉलनी, दिल्लीगेट, मकईगेट ४ कोटी ७६ लाखांतून जलवाहिनी टाकणे, सूतगिरणी व गारखेडा येथे सव्वादोन कोटी, नक्षत्रवाडी, एमबीआर व फारोळा पंपिंग स्टेशन व इतर दुरुस्तीसाठी साडेपाच कोटी मिळून १५ कोटींचा प्रस्ताव स्मार्ट सिटीच्या बैठकीत ठेवला. चर्चेअंती या प्रस्तावाला मंजुरी मिळणार आहे.

Web Title: The water supply schedule collapsed again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.