पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण कराव्यात- नायक
By Admin | Published: November 10, 2014 11:35 PM2014-11-10T23:35:36+5:302014-11-10T23:51:00+5:30
जालना : जिल्ह्यात या वर्षात कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या परिस्थितीमध्ये नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे
जालना : जिल्ह्यात या वर्षात कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या परिस्थितीमध्ये नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे यासाठी अपूर्ण असलेल्या पाणी पुरवठा योजना तातडीने पूर्ण करुन घेण्याबरोबरच मागणीनुसार टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा. पाणी पुरवठ्या संदर्भात एकाही नागरिकांची तक्रार येणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी आज येथे आयोजित पाणी टंचाई व चारा टंचाई संदर्भात आयोजित बैठकीत बोलताना दिले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) एन.आर. शेळके, जालन्याचे उप विभागीय अधिकारी मंजुषा मुथा, भोकरदनचे उप विभागीय अधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा, अंबडचे उप विभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, परतूरचे उप विभागीय अधिकारी अरविंद लोखंडे, तहसीलदार छाया पवार, रूपा चित्रक, रेवनाथ लबडे, अभय चव्हाण, महेश सावंत, भाऊसाहेब थोरात, नायब तहसिलदार सोनाली जोंधळे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एन. तांगडे, वरिष्ठ भू- वैज्ञानिक प्रकाश शेलार, उप विभागीय कृषी अधिकारी ए.आर. देशमुख, बी.एम. रोकडे, श्री जोशी, जारवाल यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी नायक म्हणाले की, जिल्ह्यात पाणीटंचाई तसेच चाराटंचाईवर मात करण्यासाठी अपूर्ण असलेल्या पाणी पुरवठा योजना तातडीने पूर्ण करुन घ्याव्यात. यामध्ये नवीन विंधन विहिर, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, नळ योजना, तात्पुरती पूरक योजना, खाजगी विहिर अधिग्रहण करणे, बुडकी घेणे, जलभंजन करणे तसेच मागणीनुसार टँकरद्वारे पाणी पुरवठा आदी कामे करण्याबरोबरच तांत्रिक कारणाअभावी बंद असलेल्या योजना तातडीने दुरुस्त करुन घ्याव्यात. विद्युत पुरवठ्या अभावी ज्या ठिकाणच्या पाणी पुरवठा योजना बंद असतील त्या तातडीने सुरु करण्यात याव्यात. तसेच नादुरुस्त असलेले हातपंपही दुरूस्त करुन घ्यावेत. त्याचबरोबर जिल्ह्यात असलेल्या पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी करावी व अनाधिकृतपणे पाणी उपसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.