श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेवर जलसंकट?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:11 AM2017-11-13T00:11:29+5:302017-11-13T00:11:36+5:30
दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा महिनाभरावर येवून ठेपलेली असताना जिल्हा परिषद प्रशासनाकडून अद्याप कुठलीही तयारी करण्यात आली नाही़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी घोषणा केलेला साडेपाच कोटींचा निधीही दृष्टिपथात नाही़ त्यात दुष्काळाच्या काळात अख्ख्या लोहा तालुक्याची तहान भागविणाºया पाणीपुरवठा योजनेची वीज ६० लाखांच्या थकबाकीपोटी तोडण्याची तयारी महावितरणने केली आहे़ त्यामुळे माळेगाव यात्रेवर जलसंकटाचे सावट आहे़
शिवराज बिचेवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा महिनाभरावर येवून ठेपलेली असताना जिल्हा परिषद प्रशासनाकडून अद्याप कुठलीही तयारी करण्यात आली नाही़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी घोषणा केलेला साडेपाच कोटींचा निधीही दृष्टिपथात नाही़ त्यात दुष्काळाच्या काळात अख्ख्या लोहा तालुक्याची तहान भागविणाºया पाणीपुरवठा योजनेची वीज ६० लाखांच्या थकबाकीपोटी तोडण्याची तयारी महावितरणने केली आहे़ त्यामुळे माळेगाव यात्रेवर जलसंकटाचे सावट आहे़
यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात दक्षिण भारतातून भाविक श्रीक्षेत्र माळेगाव येथे खंडोबाच्या दर्शनासाठी येतात़ लाखोंच्या संख्येने हौसे-नवशे-गवशेही यात्रेत सहभागी होतात़ येत्या १६ डिसेंबरला पालखीपासून यात्रेला सुरुवात होते, परंतु जिल्हा परिषदेत एकमेकांच्या तंगड्या ओढण्यात मश्गुल असलेल्या पदाधिकाºयांनी माळेगाव यात्रेच्या नियोजनासाठी अद्याप एकही बैठक घेतली नाही़ जवळपास पंधरा लाखांवर भाविक या यात्रेत येत असल्यामुळे त्यांच्यासाठी शुद्ध पाणी, रस्ते, दिवाबत्ती, निवारा आणि सुरक्षा ही कामे जिल्हा परिषद कधी करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे़ या सुविधा पुरविण्यास ग्रामपंचायत सक्षम नाही़ त्यामुळे ग्रामपंचायतीची सर्व मदार ही जिल्हा परिषदेवरच आहे़ तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माळेगावात धनगर मेळाव्यानिमित्त आले होते़ त्यावेळी त्यांनी ५ कोटी ५५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांची घोषणा केली होती, परंतु छदामही अद्याप मिळाला नाही़ यात्रा तोंडावर असताना, मुख्यमंत्री कार्यालयातून ग्रामपंचायतीशी संपर्क साधण्यात आला़ बांधकाम विभागाकडून निधीबाबत सचिवालयात फाईल पाठविल्याचे सांगण्यात आले़ परंतु वरातीमागून घोडे असा हा प्रकार असून यात्रेपूर्वी हा निधी मिळण्याची शक्यता कमीच आहे़ तर दुसरीकडे दुष्काळाच्या काळात अख्ख्या लोहा तालुक्याची तहान भागविणाºया पाणीपुरवठा योजनेवर गंडांतर आले आहे़ दिवंगत विलासराव देशमुख यांचे वडील दगडोजीराव देशमुख यांनी २० वर्षांपूर्वी लिंबोटीतून माळेगावला जलवाहिनीद्वारे पाणी आणण्यासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता़ त्यातून माळेगावला पाणीपुरवठाही करण्यात येत होता़ परंतु मागील वर्षी लोहा तालुक्यात दुष्काळ पडला होता़ तत्कालीन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, एसडीओ अश्विनी पाटील यांनी बैठक घेतली होती़ त्यात योजनेद्वारे लोहा तालुक्याची तहान भागविण्यात आली़ परंतु प्रशासनाकडून त्या काळात पाणीपुरवठा केल्याचे वीजबिल देण्यात आले नाही़ त्यामुळे ६० लाखांच्या थकबाकीपोटी आता महावितरण या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा तोडण्याची तयारी करीत आहे़ त्यामुळे ऐन यात्रेच्या काळात प्रशासनाला पाणीपुरवठ्यासाठी धावपळ करावी लागणार आहे़