शहराला चार टँकर्सद्वारे पाणीपुरवठा
By Admin | Published: February 25, 2017 12:38 AM2017-02-25T00:38:25+5:302017-02-25T00:41:40+5:30
जालना : जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेला गळती लागल्याने शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.
जालना : जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेला गळती लागल्याने शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. दरम्यान जलवाहिनी दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने आणखी आठ ते दहा दिवस नळांना पाणी येणार नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नगर पालिकेच्या वतीने चार टँकरद्वारे शहराला पाणी पुरवठा सुरू केला असल्याचे नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी सांगितले.
जायकवाडी योजनेची जलवाहिनी पैठण येथील पंप हाऊस जवळ फुटल्याने जुना जालना भागावर टंचाईचे संकट ओढावले आहे. जलवाहिनी दुरूस्ती युध्दपातळीवर केली जात आहे. त्यामुळे आगामी आठ- दहा दिवस शहराला पाणी पुरवठा होणार नसल्याने या कालावधीत जुना जालना भागात घाणेवाडीचे पाणी देण्यासाठी पालिकेच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत.
जलवाहिनी दुरूस्तीच्या कामांमुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने शहर वासिंयाना पाणीटंचाई भासू नये म्हणून शहरात टँकर उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यांनीही तात्काळ दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे ४ टँकर उपलब्ध करून दिले. याद्वारे शुक्रवारपासून शहरात पाणी पुरवठा करण्यास सुरूवात झाली असल्याचे सांगून नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)