शेंद्रा, जालना एमआयडीसीसाठी आता नवीन जलवाहिनीतून पाणीपुरवठा

By बापू सोळुंके | Published: February 6, 2024 03:16 PM2024-02-06T15:16:07+5:302024-02-06T15:20:01+5:30

सुमारे २५ वर्षांपूर्वी शेंद्रा पंचतारांकित वसाहत स्थापन झाली, तेव्हा तेथील उद्योगासाठी एमआयडीसीने जुन्याच पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा सुरू केला होता.

Water supply to Shendra, Jalna MIDC now through new pipeline | शेंद्रा, जालना एमआयडीसीसाठी आता नवीन जलवाहिनीतून पाणीपुरवठा

शेंद्रा, जालना एमआयडीसीसाठी आता नवीन जलवाहिनीतून पाणीपुरवठा

छत्रपती संभाजीनगर : शेंद्रा आणि जालना येथील औद्याेगिक वसाहतीसाठी आता ३६ एमएलडी क्षमतेच्या नवीन जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.पैठण ते शेंद्रा एमआयडीसी अशी सुमारे ५८ किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकल्यानंतर जायकवाडी प्रकल्पात स्वतंत्र जॅकवेल उभारण्यात आले.

सुमारे २५ वर्षांपूर्वी शेंद्रा पंचतारांकित वसाहत स्थापन झाली, तेव्हा तेथील उद्योगासाठी एमआयडीसीने जुन्याच पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा सुरू केला होता. तसेच जालना येथील औद्योगिक वसाहतीसाठीही याच पाइपलाइनमधून पाणीपुरवठा व्हायचा. दहा वर्षांपूर्वी ऑरिक सिटीअंतर्गत डीएमआयसीच्या शेंद्रा आणि बिडकीन येथे औद्योगिक वसाहती मंजूर झाल्या. यासाठी सुमारे १० हजार एकर जमीन एमआयडीसीने संपादित केली आहे. पहिल्या टप्प्यात ऑरिकचा शेंद्रा औद्योगिक पट्टा विकसित करण्यात आला. या पट्ट्यातील उद्योगांसाठी ऑरिक प्रशासन एमआयडीसीकडून पाणी घेईल, असे ठरले होते. यानंतर एमआयडीसीने जायकवाडी प्रकल्पापासून ते शेंद्र्यापर्यंत ३६ एमएलडी क्षमतेची स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेतला. २०१५ मध्ये जलवाहिनी टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली. हे काम दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाले. खोडेगाव येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले.

यासोबतच जायकवाडी प्रकल्पात स्वतंत्र जॅकवेल स्थापन करण्यात आले. नुकतीच पंपहाउसच्या इलेक्ट्रिफिकेशनची कामे पूर्ण करण्यात आली आणि नवीन जलवाहिनीतून एमआयडीसीला पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. याविषयी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता रमेशचंद्र गिरी म्हणाले की, नवीन ३६ एमएलडी जलवाहिनीतून आता शेंद्रा आणि जालना औद्योगिक वसाहतींना पाणी पुरवठा सुरू झाला आहे. जायकवाडी धरणात आमचे जॅकवेल आहे. या धरणाशेजारी पक्षी अभयारण्य आहे. यामुळे संबंधित विभागाची परवानगीसाठी आमचा बराच कालावधी गेल्याने योजना पूर्ण होण्यास थोडा विलंब झाला.

डीएमआयसीसाठी २० एमएलडी पाणी राखीव
डीएमआयसीच्या शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक पट्ट्यासाठी २० एमएलडी पाणी आम्ही देणार आहोत. याकरिता हे पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. सध्या ऑरिक सिटीच्या शेंद्रा औद्योगिक पट्ट्याला नव्या जलवाहिनीतूनच पाणीपुरवठा हाेतो. बिडकीन औद्याेगिक वसाहतीमध्ये अद्याप उद्योग आल्यानंतर या वसाहतीलाही पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
 

Web Title: Water supply to Shendra, Jalna MIDC now through new pipeline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.