औरंगाबाद तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे टँकर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 09:32 PM2019-06-11T21:32:26+5:302019-06-11T21:33:58+5:30
गेल्या तीन दिवसांपासून औरंगाबाद तालुक्यातील पुर्वेकडील १३४ गावांत पिण्याचा पाण्याचा एकही टँकर गेला नसून, पंचायत समिती कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी संपर्कात नसल्याने ग्रामीण भागात संतापाची लाट उसळली आहे.
करमाड : गेल्या तीन दिवसांपासून औरंगाबाद तालुक्यातील पुर्वेकडील १३४ गावांत पिण्याचा पाण्याचा एकही टँकर गेला नसून, पंचायत समिती कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी संपर्कात नसल्याने ग्रामीण भागात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे तालुक्यात पाणीबाणी झाली असून, मिळेल तेथून अशुद्ध पाण्यावर ग्रामीण जनता तहान भागवत असल्याचे चित्र आहे.
औरंगाबाद तालुक्यात १७४ गावे असून, या सर्व गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. ११४ ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या या सर्व गावांची तहान २०२ शासकीय टँकरवर भागविण्यात येत आहे. तालुक्यातील ४ लाख १५ हजार लोकसंख्येला विहिरी कोरड्या पडल्याने पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवरच अवलंबून रहावे लागत आहे. तालुक्यातील सुखना व लाहुकी या मध्यम प्रकल्पांसह दहा लघु सिंचन तलाव कोरडे पडले आहेत.
त्यामुळे जनतेबरोबर जनावरांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे. औरंगाबाद तालुक्यातील पूर्वेकडील १३४ गावांचे १४५ टँकर शेंद्रा एमआयडीसीमधील पॉइंटवर भरले जातात. परंतु शुक्रवारपासून यातील एकही टँकर पाण्याने भरून एकाही गावात आलेला नाही.
तलाठी व ग्रामसेवक,कृषी सहाय्यक या शासकीय कर्मचाऱ्यांनी दुष्काळ सदृश्य परिस्थिती हाताळण्यासाठी गावातच थांबावे, असा शासन आदेश आहे. परंतु तीन दिवसांपासून ग्रामीण भागातील जनतेला या कर्मचारी दिसून आले नाहीत. तसेच गटविकास अधिकारी फोन उचलत नाहीत अशा असंख्य तक्रारी कोनेवाडी, दुधड, मंगरूळ, पिंपळखुटा आदी गावांतील सरपंचांनी केल्या आहेत.
लवकरात लवकर पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू झाले नाही तर औरंगाबाद तालुक्यातून जनतेचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. यासाठी संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा लोकप्रतिनिधीनी दिला आहे.