‘तेरणा, वाघोली’तूनही पाणी उपसा
By Admin | Published: November 7, 2014 12:35 AM2014-11-07T00:35:32+5:302014-11-07T00:41:39+5:30
तेर : येथील तेरणा प्रकल्पामध्ये सध्या केवळ १० ते १५ टक्के इतका अत्यल्प पाणीसाठा असतानाही प्रकल्पातून शेतीसाठी पाणीउपसा होत आहे.
तेर : येथील तेरणा प्रकल्पामध्ये सध्या केवळ १० ते १५ टक्के इतका अत्यल्प पाणीसाठा असतानाही प्रकल्पातून शेतीसाठी पाणीउपसा होत आहे. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्यासाठी या धरणावर अवलंबून असलेल्या गावांना टंचाईचे चटके सोसावे लागणार आहेत.
यंदा तेरणा धरण क्षेत्र परिसरामध्ये अत्यल्प पावसामुळे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला नाही. दरम्यान, या धरणातून तेर, ढोकी, तडवळा आणि येडशी या चार गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु, सध्या या प्रकल्पामध्ये अवघा १० ते १५ टक्के इतका अत्यल्प पाणीसाठा आहे. असे असतानाच धरण परिसरातील शेतकरी विशेषत: रात्रीच्यावेळी शेतीसाठी पाणीऊपसा करीत आहेत. असाच पाणीउपसा सुरू राहिल्यास भविष्यात उपरोक्त चारही गावांना भीषण तोंड द्यावे लागणार आहे. दरम्यान, हा प्रश्न लक्षात घेवून ग्रामपंचायतीने ३ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून अनधिक्रतपणे सुरू असलेला पाणीउपसा थांबविण्याची मागणी केली आहे. परंतु, अद्यापही धरणक्षेत्रातील वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला नाही. याबाबत शाखा अभियंता आय. पी. बांगड यांच्याशी संपर्क साधला असता वीजपुरवठा खंडित करण्याबाबत महावितरणला पत्र दिल्याचे सांगितले आहे. (वार्ताहर)
तेर : तालुक्यातील वाघोली येथील मध्यम प्रकल्पामध्ये सध्या बऱ्यापैकी पाणीसाठा आहे. परंतु, येथेही मोटारींचे मोठे जाळे दिसून येत आहे. भविष्यातील टंचाईचे चित्र लक्षात घेवून शेतीसाठी पाणीउपसा करू नये, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. परंतु, येथेही बेसुमार पाणीउपसा सुरू असून, तो तसाच सुरू राहिल्यास भविष्यात परिसरातील गावांनाही टंचाईचे चटके सोसावे लागणार आहेत. जिल्ह्यात चालू वर्षी सरासरीपेक्षा कमीच पाऊस पडला आहे. परिणामी आतापासूनच अनेक गावांना टंचाईचे चटके बसू लागले आहेत. त्यामुळे ज्या प्रकल्पांमध्ये पाणी आहे, ते पिण्यासाठी आरक्षित करण्याची गरज निर्माण झाली आहे. असे असतानाही सध्या या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात खुलेआम पाणीउपसा करण्यात येत आहे. असे असतानाही कारवाईचे धाडस प्रशासनाकडून दाखविले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.