अंडरग्राऊंडमध्ये शिरले पाणी

By Admin | Published: June 25, 2014 01:25 AM2014-06-25T01:25:25+5:302014-06-25T01:29:24+5:30

औरंगाबाद : क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन या रोडवरील ३०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिनीचा आज पहाटे ५ वा. जोड निखळून लाखो लिटर पाणी वाया गेले.

Water in the underground | अंडरग्राऊंडमध्ये शिरले पाणी

अंडरग्राऊंडमध्ये शिरले पाणी

googlenewsNext

औरंगाबाद : क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन या रोडवरील ३०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिनीचा आज पहाटे ५ वा. जोड निखळून लाखो लिटर पाणी वाया गेले. अर्धा तास पाणी वाहून वाया गेल्यामुळे चार वॉर्डांना कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. सादातनगर, राहुलनगर, हमालवाडा, रेल्वेस्टेशन परिसरात उशिरा पाणीपुरवठा झाला. वेदांतनगर येथील जीवन प्राधिकरणाच्या आवारातील जलकुंभातून ती जलवाहिनी वरील वॉर्डांत जाते.
जलवाहिनीचे पाणी सिद्धार्थ आर्केड या व्यापारी संकुलाच्या अंडरग्राऊंडमधील दुकानांमध्ये शिरले. दुकानातील पाणी दुपारी १ वाजेपर्यंत उपसून टाकण्यात येत होते. व्यापाऱ्यांनी या घटनेसाठी पालिकेला व कंत्राटदाराला दोषी धरले.
का फुटली जलवाहिनी
क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे ६०० मीटर अंतरातील जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम १५ लाख रुपयांच्या खर्चातून सुरू आहे. २०० मीटरचे काम संपले आहे. आणखी ४०० मीटरचे काम बाकी आहे. पाणीपुरवठा बंद करून काम करणे शक्य नाही. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात जलवाहिनीला जोड देऊन पाणीपुरवठा केला जात आहे.
गोल्डी सिनेमागृहाजवळील जोड उच्चदाबामुळे निखळून पडला. त्यामुळे जलवाहिनी स्थलांतर करण्यासाठी खोदलेल्या आठ फूट खड्ड्यांमध्ये पाणी साचले. ते पाणी सिद्धार्थ आर्केड व लाभ चेंबर्सच्या अंडरग्राऊंडमध्ये शिरले.
लाईनमनचा अंदाज चुकला
जलवाहिनीचा व्हॉल्व्ह उघडताना लाईनमनचा अंदाज चुकला. त्याने जी जलवाहिनी बंद आहे, तिचा व्हॉल्व्ह उघडला. तो व्हॉल्व्ह पूर्णपणे उघडल्यामुळे पाणी प्रेशरने गेले आणि जोड निखळला. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे म्हणाले.
1सिद्धार्थ आर्केडमध्ये तळघरात असलेल्या दुकानांमध्ये साचलेले पाणी असे मोटार लावून बाहेर काढण्यात आले.
2तळघरात साचलेले पाणी.
3जलवाहिती वळविण्याच्या कामात त्रुटी राहिल्याने परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरले.
व्यापारी म्हणतात लाखोंचे नुकसान
मधुर मिलन मिठाई विके्रते बी. एच. राजपुरोहित म्हणाले, अंदाजे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पाणी किचनपर्यंत गेले. अंडरग्राऊंड वॉटरप्रूफ आहे. मनपाच्या व कंत्राटदाराच्या चुकीमुळे पाणी आत शिरले.
ट्रॅव्हल एजन्सीचे मालक आमेर हुसैनी म्हणाले, पाण्यामुळे संगणक खराब झाले. झेरॉक्स मशीनमध्ये पाणी गेले. नवीन फर्निचरचे काम सुरू होते. त्याचेही नुकसान झाले आहे.
ज्यूस सेंटरचे मालक मन्नान खान म्हणाले, पाण्यामुळे फ्रीज जळाले आहे. पाण्यामुळे फरशी उखडून गेली. दुकानात २ फु टांपर्यंत पाणी झिरपून आले आहे. उपसण्यासाठी मशीन लावावी लागली.
फास्ट फूड चालक ललित भंडारी म्हणाले, मनपाने कामाची नोटीस देणे गरजेचे होते. निष्काळजीपणे मनपाने काम केले. त्याचा भुर्दंड आमच्यासारख्या सामान्य व्यापाऱ्यांना बसला. हे नुकसान कोण भरून देणार हा प्रश्न आहे.

Web Title: Water in the underground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.