पाण्याचा अपव्यय; शेतीचेही नुकसान
By Admin | Published: May 16, 2017 12:04 AM2017-05-16T00:04:28+5:302017-05-16T00:06:26+5:30
अणदूर : एकीकडे भीषण उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असतानाच दुसरीकडे मात्र कालवा फुटून व झिरपून लाखो लिटर पाणी शेतशिवारात घुसले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अणदूर : एकीकडे भीषण उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असतानाच दुसरीकडे मात्र कालवा फुटून व झिरपून लाखो लिटर पाणी शेतशिवारात घुसले आहे. यामुळे येथील नागझरी परिसरातील अनेकांची शेतजमीन पाण्याखाली जावून चवाळे लागल्याने ही जमीन नापीक बनली आहे. असे असताना प्रशासनाने मात्र अद्याप याकडे पाहिले नसल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत आहे.
नळदुर्ग येथील कुरनूर प्रकल्पातून (बोरी धरण) उन्हाळी पिकांसाठी कालव्यामध्ये पाणी सोडण्यात येथे. परंतु, सन २०१४, २०१५ व २०१६ या वर्षांमध्ये दुष्काळ असल्यामुळे हे पाणी सोडण्यात आले नाही. गतवर्षी मुबलक पाऊस झाल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे यंदा उन्हाळी पिकांसाठी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले. याचा लाभ अणदूर, नळदुर्ग, वागदरी, येडोळा, खुदावाडी, शहापूर, गुजनूर, सराटी, धनगरवाडी, बाभळगाव आदी गावच्या शिवारातील शेतीला होतो. परंतु, हे पाणी सोडण्यापूर्वी कालव्याची दुरूस्ती व्यवस्थित झाली नसल्यामुळे नागणखोरीनजिक कालवा फुटून लाखो लिटर पाणी अक्षरश: शेतात घुसले आहे. त्यामुळे अनेकांच्या जमिनीला चवाळ लागले आहे. अशा परिस्थितीत या भागातील शेतकरी खरीप पेरणीपूर्वीची मशागतही करू शकत नाही. ऊस पिकातील अंतर्गत मशागतीचे कामही चवाळ लागल्यामुळे बंदच आहे. याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटकास बसत असून, प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.