पोलीस होण्याच्या स्वप्नांवर फिरणार पाणी
By Admin | Published: March 1, 2016 12:29 AM2016-03-01T00:29:58+5:302016-03-01T00:29:58+5:30
औरंगाबाद : पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून दिवसरात्र एक करून परिश्रम घेतले. त्यासाठी संपूर्ण तयारी केली. आता भरती अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे
औरंगाबाद : पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून दिवसरात्र एक करून परिश्रम घेतले. त्यासाठी संपूर्ण तयारी केली. आता भरती अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे. त्यासाठी फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक आहे; परंतु उमेदवारांना घाटी रुग्णालय आणि जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय प्रशासन इतरांकडे बोट दाखवून थेट माघारी पाठवीत आहेत. त्यामुळे पोलीस होण्याच्या स्वप्नांवर पाणी फिरण्याची परिस्थिती निर्माण होत असल्याने शेकडो उमेदवारांनी सोमवारी तीव्र संताप व्यक्त केला.
पोलीस भरतीपूर्व वैद्यकीय तपासणीसाठी काही दिवसांपासून इच्छुक उमेदवार घाटी रुग्णालयात येत आहेत. छातीचा एक्सरे, रक्त चाचणी, शुगर, रक्तदाब इ. तपासण्या करून फिटनेस प्रमाणपत्र मिळविणे आवश्यक आहे. घाटीने अनेकांना प्रमाणपत्रांचे वितरण केले; परंतु उमेदवारांची गर्दी वाढत असल्याने आता घाटी रुग्णालय आपली जबाबदारी नसल्याचे म्हणत प्रमाणपत्र देण्याचे टाळत आहे. त्यामुळे तपासण्या केलेल्या शेकडो उमेदवारांना वारंवार घाटीत चकरा माराव्या लागत आहेत, अशा उमेदवारांनी सोमवारी सकाळपासून घाटीत गर्दी करीत संताप व्यक्त केला. त्यांना घाटीतर्फे जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय येथे जाण्यास सांगण्यात आले; परंतु तिकडूनही माघारी पाठविण्यात आले.
घाटीत विविध तपासण्या केल्या. अनेकांना प्रमाणपत्र दिले; परंतु आता प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली जात आहे, असे त्रस्त उमेदवारांनी सांगितले.