उदगीरला उद्या मिळणार पाणी
By Admin | Published: May 4, 2016 12:14 AM2016-05-04T00:14:13+5:302016-05-04T00:18:34+5:30
उदगीर : उदगीर शहराला वागदरीच्या तलावातून पाणीपुरवठा करण्यासाठी मंजूर झालेल्या १० पैकी ३ टँकर मंगळवारी रात्री लातूरहून उदगीरला आले़ उर्वरीत ७ टँकर नांदेडहून निघाले आहेत़
वागदरीत चाचणी : देवणीत सर्वपक्षीय विरोधाची मोट
उदगीर : उदगीर शहराला वागदरीच्या तलावातून पाणीपुरवठा करण्यासाठी मंजूर झालेल्या १० पैकी ३ टँकर मंगळवारी रात्री लातूरहून उदगीरला आले़ उर्वरीत ७ टँकर नांदेडहून निघाले आहेत़ या सर्व टँकरद्वारे बुधवारपासून पाण्याची वाहतूक सुरु होणार आहे़ त्यानंतर हे पाणी फिल्टर होवून गुरुवारी उदगीरकरांच्या घागरीत पडण्याची अपेक्षा नगरपरिषदेला आहे़ दरम्यान, देवणीत मात्र यास विरोध सुरु झाला आहे़
उदगीर शहराच्या पाणीपुरवठ्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे़ बनशेळकी, भोपणी प्रकल्प कोरडे झाल्याने एकमेव देवर्जन प्रकल्पातून पाण्याचा उपसा केला जात आहे़ मात्र, येथेही तलाव कोरडा पडू लागल्याने पाण्याची आवक घटत चालली आहे़ त्यामुळे निर्माण झालेल्या टंचाईला तोंड देण्यासाठी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी प्रत्येकी २५ हजार लिटर्स क्षमतेचे १० टँकर मंजूर केले आहेत़ या टँकरद्वारे वागदरी तलावातून दररोज १० लाख लिटर्स पाणी उदगीरसाठी उचलण्याची तयारी केली जात आहे़ वागदरीच्या तलावात नगरपरिषदेने मोटार बसवून त्यास विद्युत जोडणीही घेतली आहे़ सोमवारी सायंकाळी हे काम पूर्ण झाल्यानंतर चाचणी घेण्यात आली़ ती यशस्वी झाली आहे़ त्यामुळे आता टँकरची प्रतीक्षा आहे़ मंजूर झालेल्या १० टँकर्सपैैकी ३ टँकर मंगळवारी सायंकाळी लातुरातून उदगीरकडे रवाना झाले़ तर उर्वरीत ७ टँकर नांदेडहून निघाले आहेत़ त्यामुळे बुधवारी सकाळपासून या सर्व टँकरच्या वागदरीच्या तलावातून फेऱ्या सुरु होणार आहेत़ येथील पाणी उदगीर पालिकेच्या बनशेळकी फिल्टरजवळील मोठ्या खड्ड्यात एकत्र करुन ते फिल्टर केले जाणार आहे़ त्यानंतर ते उदगीरमध्ये आणून नळाद्वारे वितरीत केले जाणार आहे़ या प्रक्रियेनुसार उदगीरच्या काही भागामध्ये गुरुवारी वागदरीचे पाणी मिळण्याची अपेक्षा आहे़ (प्रतिनिधी)
पाण्यासाठी देवणी-उदगीरात संघर्ष़़़
एकीकडे उदगीरकर पाणी मिळविण्यासाठी संघर्ष करीत असतानाच देवणीकरांनीही वागदरीच्या पाण्यावरुन संघर्षाची तयारी चालविली आहे़ देवणीसाठी या तलावातून आधीपासूनच पाणी घेणे सुरु आहे़ ३० जूनपर्यंत देवणीला १ कोटी ९६ लाख लिटर्स पाणी आवश्यक आहे़ उदगीरसाठी येथून उचल सुरु झाल्यास हे पाणी देवणीला पुरणार नाही, असा दावा करीत देवणीत सर्वपक्षीय विरोधाची मोट बांधली जात आहे़ उदगीरला विरोध नाही परंतु, आधी देवणीची व्यवस्था करुनच मग पाणी द्यावे, असा सूर देवणीतून उमटत आहे़