बोर दहेगावात सहा महिन्यांपासून पाणीबाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:26 AM2018-12-19T00:26:14+5:302018-12-19T00:26:35+5:30
वैजापुरात मोर्चा : सरपंच, ग्रामसेवक हजर नसल्याने ग्रामस्थ पंचायत समितीत धडकले
वैजापूर : तालुक्यातील बोर दहेगाव येथे मागील सहा महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. मागासवर्गीय वस्ती व गावातील काही लोकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी निष्क्रिय ग्रामपंचायतीच्या विरोधात मंगळवारी मोर्चा काढला.
ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच व ग्रामसेवक उपस्थित नव्हते. ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप होते. मागील सहा महिन्यांपासून गावात पाणी नाही, पण खाजगी वॉटर फिल्टरला पाणी कसे, बोअरवेलचे पाणी विक्रीसाठी आहे, पण गावातील लोकांना नाही. त्यामुळे फिल्टरला जाणारे पाणी त्वरित बंद करून ते पाणी गावात सोडावे व खाजगी फिल्टरचे पाणी विक्री करून पैसे कमावण्याचा गोरखधंदा बंद करण्यात येऊन गावाला सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी या गावातील मोर्चेकरी तरुण व महिलांनी केली.
तक्रार करुनही दखल नाही
शोभा उगले, कडूबाई त्रिभुवन, अंबिका वाघ, भाऊसाहेब शेलार, नानासाहेव उगले, सुनील उगले, राजू त्रिभुवन आदींसह ६० लोकांनी गटविकास अधिकारी वैजापूर अजयसिंग पवार यांच्याकडे लेखी तक्रार दिलेली होती. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे गावातील तरुणांनी व महिलांनी एकत्र येऊन ग्रामसेवक व सरपंच यांच्या विरोधात आक्रमक होऊन पंचायत समिती कार्यालयावर पाण्यासाठी मोर्चा काढला. यावेळी अमोल शेलार, प्रवीण त्रिभुवन, संतोष शेलार, राहुल शिंदे, पावन शिनगारे, राहुल शेलार, सोमनाथ शेलार, राजू शेलार, रामचंद्र शेलार, गौतम त्रिभुवन, विशाल शेलार, रामनाथ शेलार, अशोक शिनगारे, संदीप शिंदे, रवी शिंदे, भगवान शेलार मोर्चात सहभागी झाले होते.