उन्हाळ्यात पाणी पाजले; टँकर, अधिग्रहीत विहिरींचे पैसे हिवाळ्यात मिळणार काय?
By विजय सरवदे | Published: August 31, 2024 07:35 PM2024-08-31T19:35:31+5:302024-08-31T19:35:38+5:30
टँकर, अधिग्रहीत विहिरींसाठी १९२ कोटींचा मोबदला रखडला
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील ५४५ गावांना ऑक्टोबरपासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागला. त्यामुळे प्रशासनाने ऑक्टोबर ते मेदरम्यान ७३२ टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन केले होते. यासाठी ४०२ विहिरींचे अधिग्रहण करावे लागले. मात्र, आतापर्यंत टँकर पुरवठाधारक आणि अधिग्रहीत विहिरींच्या शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही. यासाठी जि.प. पाणीपुरवठा विभागाने टँकरचा मोबदला १८५ कोटी ३२ लाख ८६ हजार, तर अधिग्रहीत विहिरींच्या मोबदल्यासाठी ६ कोटी ७५ लाख ५५ हजार, असा एकणू १९२ कोटी ८ लाख ४१ हजार रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे केली आहे.
गेल्या वर्षी पावसाने सरासरीही ओलांडली नव्हती. त्यामुळे नदी, विहिरी, तलाव, बंधारे कोरडे पडले होते. परिणामी, हिवाळ्यापासूनच जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट पडले होते. जि.प. पाणीपुरवठा विभागाने तातडीने पाऊले उचलत घशाला कोरड पडलेली गावे आणि वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले. यासंबंधीचा जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आलेला पाणीटंचाई कृती आराखडा मंजूर करण्यात आला. पण, अद्यापही टँकर पुरवठाधारक आणि अधिग्रहीत विहिरींच्या शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही.
उन्हाळ्यात किती अधिग्रहण ?
विहिरी - जिल्ह्यात टँकरसाठी ४०२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले.
टॅंकर - जिल्ह्यात ७३२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला.
कोणत्या तालुक्यात किती?
तालुका- विहीर अधिग्रहण- टँकर
छ. संभाजीनगर- १६- १०५
फुलंब्री- ६३- ७५
सिल्लोड- ४२- १०४
सोयगाव- ९- २
कन्नड- ६९- ३७
खुलताबाद- २३- १०
गंगापूर- ५२- १४७
वैजापूर- १२१- १४६
पैठण- ०७- १०६
अधिग्रहणाचे ६ कोटी कधी मिळणार?
खाजगी टँकर पुरवठादारांचा १८५ कोटी ३२ लाख ८६ हजार, तर अधिग्रहीत विहिरींच्या मोबदल्यासाठी ६ कोटी ७५ लाख ५५ हजार, असा एकूण १९२ कोटी ८ लाख ४१ हजार रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
शासनाकडे प्रस्ताव सादर
ऑक्टोबर ते मे अखेरपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यासाठी जिल्ह्यातील विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या होत्या. टँकर आणि अधिग्रहीत विहिरींचा मोबदला अद्याप प्राप्त झालेला नाही. यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून, निधी प्राप्त होताच तो वितरित केला जाईल.
- अजित वाघमारे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, जि.प.