पैठण तालुक्यात कोरोनाची लाट ओसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:03 AM2021-06-20T04:03:56+5:302021-06-20T04:03:56+5:30
चार महिन्यांनंतर दिलासा : पाच कोविड सेंटरमध्ये २४ रुग्णांवर उपचार सुरू पैठण : तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याने ...
चार महिन्यांनंतर दिलासा : पाच कोविड सेंटरमध्ये २४ रुग्णांवर उपचार सुरू
पैठण : तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. शनिवारी आलेल्या अहवालात तालुक्यात केवळ तीन नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर सध्या पाच कोविड सेंटरमध्ये केवळ २४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे समोर आले. त्यामुळे तालुक्याच्या दृष्टीने ही दिलासा देणारी घटना आहे.
दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण पैठण तालुक्यातील ग्रामीण भागात पसरल्याने पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. शिवाय मृत्यूदरही अधिक असल्याने दुसरी लाट कधी ओसरतेय, याची प्रतीक्षा होती. दरम्यान, १ जूनपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्यास प्रारंभ झाला. कोविड सेंटरमधील रुग्णांची संख्या घटली. दरम्यान, शनिवारी आलेल्या अहवालात पाचोड दोन व मुलानी वाडगाव एक असे तीन रुग्ण आढळून आले. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करू नये, असे आवाहन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले.
--
तालुक्यातील रुग्णांचा आढावा :
पैठण तालुक्यातील ६,५४९ जणांना कोरोनाने विळखा घातला होता. दरम्यान यापैकी ६,१०३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. पाच कोविड सेंटरमध्ये आज रोजी २४ रुग्ण उपचार घेत असून, सौम्य लक्षणे असलेल्या १५६ जणांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. १५० रुग्ण औरंगाबाद व इतर ठिकाणी उपचार घेत आहेत. दरम्यान, दोन्ही लाटेत पैठण तालुक्यातील ११६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
---
चार महिन्यानंतर पाचोड कोविड सेंटर रिकामे
पाचोड : पैठण तालुक्यातील पाचोड ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटर रिकामे झाले आहे. तब्बल चार महिन्यानंतर पाचोडवासीयांना दिलासा देणारी ही घटना आहे. परिसरातील सर्व गावांना कोरोनाने विळखा घातला होता.
पाचोडला ग्रामीण रुग्णालयातील ट्रामा केअरमध्ये कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली. चार महिन्यांपासून तीस खाटांचे कोविड सेंटर कायमच रुग्णांनी भरलेले असे. दरम्यान, रुग्णांची वाढती संख्या पाहता रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी आरोग्य विभागाला नवीन कोविड सेंटर सुरू करण्याचे आदेश दिले होते. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर पोहरेगावकर यांनी ग्रामीण रुग्णालयातील दोन वॉर्ड स्वतंत्र कोरोना बाधित रुग्णांसाठी खुले केले. योग्य पद्धतीने उपचार देत व कॉन्टॅक्ट ट्रेसिंग योग्य पद्धतीने झाल्याने पाचोड परिसरातील रुग्णसंख्या कमी झाली. हाऊसफुल्ल झालेल्या कोविड सेंटरमधून रुग्ण बरे होऊन बाहेर पडू लागले. तर शनिवारी पूर्णपणे सेंटर रिकामे झाल्याने आरोग्य विभागासह नागरिकांना दिलासा मिळाला आहे, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर पोहरेगावकर यांनी सांगितले.