आमचं ठरतंय ! महापालिका निवडणुकीत तिन्ही आले तर एकत्र, नाहीतर तिन्ही स्वतंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 12:00 PM2021-10-09T12:00:50+5:302021-10-09T12:09:34+5:30

Aurangabad Municipal Corporation Election : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या स्थानिक शाखा येथे आहेत. त्यांच्याशी चर्चा करून एकत्र लढायचे की वेगवेगळे, याचा विचार होईल.

We are determined! Aurangabad Municipal Corporation elections if all three come we are together in , if not all three are independent | आमचं ठरतंय ! महापालिका निवडणुकीत तिन्ही आले तर एकत्र, नाहीतर तिन्ही स्वतंत्र

आमचं ठरतंय ! महापालिका निवडणुकीत तिन्ही आले तर एकत्र, नाहीतर तिन्ही स्वतंत्र

googlenewsNext
ठळक मुद्देमहापालिका निवडणुकीवर पालकमंत्री सुभाष देसाई यांचे स्पष्टीकरणभाजपात ‘पाॅवर’ पेक्षा ‘फूल’ बनविण्याची क्षमता अधिक

औरंगाबाद : आगामी महापालिकेच्या निवडणुकांत ( Aurangabad Municipal Corporation Election ) महाविकास आघाडीतील सर्व पक्ष आले तर एकत्र, नाहीतर स्वतंत्र निवडणुकीला सामोरे जातील, असे स्पष्टीकरण पालकमंत्री सुभाष देसाई ( Subhash Desai ) यांनी शुक्रवारी दिले.

‘लोकमत’ कार्यालयाला शुक्रवारी दिलेल्या सदिच्छा भेटीत त्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांवर थेट उत्तरे दिली. यावेळी लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्यासह संपादकीय सहकारी उपस्थित होते. पालकमंत्री देसाई म्हणाले, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या स्थानिक शाखा येथे आहेत. त्यांच्याशी चर्चा करून एकत्र लढायचे की वेगवेगळे, याचा विचार होईल. त्यांना वेगळे लढायचे असेल तर आनंदच आहे. मात्र, एकत्र लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. काही ठिकाणी आघाडी करून तिकीट वाटप केले तर प्रत्येकाचा लढण्याचा स्कोप कमी होईल. या निवडणुकीत तळागाळातील असंख्य इच्छुक असतात. त्यांना सामावून घ्यावे लागते. एकत्र लढल्यास सर्वांना एकत्र कोंबण्याचा प्रयत्न होईल, त्यातून नुकसान होऊ शकते. त्यामुळे स्थानिक परिस्थितीवर सर्व काही अवलंबून आहे.

स्थानिक पातळीवर शिवसेनेचा विस्तार मोठा आहे. अनेक वर्षांपासून शिवसेना सत्तेत आहे. त्यामुळे यंत्रणा सज्ज आहे. परंतु, महाविकास आघाडीसोबत विरोधाचा अट्टहास नाही. जर जुळले तर तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसावे. चर्चा करून अहवाल द्यावा, निर्णय वरिष्ठ घेतील. हा मत व्यक्त करण्याचा पहिला टप्पा आहे.

भाजपात ‘पाॅवर’ पेक्षा ‘फूल’ बनविण्याची क्षमता अधिक
महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीसमोर भाजपसारखा ‘पाॅवरफुल्ल’ पक्ष आहे. त्याचे आव्हान कसे पेलणार, या प्रश्नावर देसाई म्हणले, त्यांच्या पाॅवरफुल्ल शब्दातील प्रत्यक्ष ‘पाॅवर’ किती आणि ‘फूल’ बनविण्याची क्षमता किती, हा चर्चेचा विषय आहे.

समृद्धी महामार्ग, डीएमआयसी आणि ड्रायपोर्टमुळे कनेक्टिव्हिटी
देसाई म्हणाले, समृद्धी महामार्ग, डीएमआयसी आणि ड्रायपोर्ट सुविधांमुळे मुंबई बंदराच्या कनेक्टिव्हिटीचा प्रश्न सुटला आहे. विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा होत आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानंतर येथून आंतरराष्ट्रीय विमाने उड्डाण करू शकतील. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याशी यावर पुढील आठवड्यात चर्चा करणार आहे.

पैठणला जाण्यास दीड तास
औरंगाबाद ते पैठण रस्ता खराब आहे. ती कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी एमआयडीसीला प्रयत्न करण्यास सांगितले आहे. बिडकीन इंडस्ट्रीयल पार्क त्याच रस्त्यावर आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांनीही रस्त्याला प्राधान्याने करण्याची तयारी दर्शविली आहे. १५० कोटी पहिल्यांदाच शहर रस्ते विकासाला दिले. एमएसआरडीसी, एमआयडीसी, मनपाकडून ती कामे करण्यात आली आहेत, असेही उद्योगमंत्री देसाई यांनी सांगितले.

जायकवाडी भरलेले असताना शहराला पाणी नाही
यावर पालकमंत्री देसाई म्हणाले, १६८० कोटींच्या योजनेचे प्रत्यक्ष काम सुरू आहे. ५२ जलकुंभांचे काम सुरू आहे. या योजनेला अजून अडीच वर्षे लागतील. मग ताेपर्यंत पाण्यासाठी थांबायचे का? यावर उपाय म्हणून दोन महिन्यांत डिसेंबरमध्ये पाण्याच्या दिवसांचे अंतर कमी केले जाणार आहे. त्यासाठी जुन्या पाईपलाईनचे काही पाईप बदलून जास्त पाणी आणण्याचे निर्देश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास दिले आहेत.

Web Title: We are determined! Aurangabad Municipal Corporation elections if all three come we are together in , if not all three are independent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.