आम्हाला राज्यात रस, जुलै महिन्यातच मंत्रिमंडळ विस्तार करू: देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 01:00 PM2023-06-30T13:00:33+5:302023-06-30T13:01:27+5:30
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे माहिती नाही, आम्हाला राज्यात अधिक रस आहे.
छत्रपती संभाजीनगर: राज्यात शिंदे- फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. मात्र, अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होईल अशी चर्चा सुरु झालेली असताना राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावरकडे सर्वांच्या नजारा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात पुढील महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी माहिती दिली आहे. आज दुपारी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला
महाविकास आघाडीचे सरकार जाऊन राज्यात शिंदे- फडणवीस जोडीचे सरकार अस्तित्वात आले. यावेळी दोन्ही कडील मोजक्याच आमदारांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली. काही मंत्रिपदे रिक्त ठेवून अनेक इच्छुकांची विस्तारात तुमचे स्थान नक्की अशी बोळवण करण्यात आली. यामुळे वर्षभरात अनेकवेळा राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा रंगल्या, काहींनी तर तारखा जाहीर केल्या. विरोधकांनी देखील सरकार अपयशी ठरत असल्याने विस्तार टाळत असल्याची टीका केली.
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पूर्वी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होईल कि नंतर यावर राजकीय चर्चा झडत आहेत. मात्र, राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर आता खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, केंद्र आणि राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्ताराचा काही संबंध नाही. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे माहिती नाही, आम्हाला राज्यात अधिक रस आहे. राज्यातील अनेक प्रश्न असतात त्यासाठी केंद्राची भेट घ्यावी लागते त्याचा पाठपुरावा करावा लागतो या संदर्भातच अनेक बैठक असतात त्यामुळे केंद्र जावं लागतं असं फडणवीस म्हणाले. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ते म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तार आम्हाला देखील करायचा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत निर्णय घेतील मी विश्वासाने सांगतो की जुलै महिन्यामध्ये आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करू.
पुढील आठ दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार - शिरसाट
राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठ दिवासांत होईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते, आमदार संजय शिरसाट यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. तसेच केंद्रात देखील फेरबदल होणार आहेत. यात शिंदे गटाला दोन मंत्रिपद मिळणार असल्याची शक्यता सिरसाट व्यक्त केली.