कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास आम्ही तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 01:45 PM2020-09-25T13:45:03+5:302020-09-25T13:45:10+5:30
बाजार समितीला मुदतवाढ मिळू नये या हेतूने या तक्रारी करण्यात येत आहेत. यासंदर्भात चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत, असे पठाडे यांनी सांगितले
औरंगाबाद : राज्यातील ८० कृषी उत्पन्न बाजार समित्यांना मुदत संपल्यानंतर मुदतवाढ देण्यात आली. परंतू औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती भाजपच्या ताब्यात असल्यामुळेच मुदतवाढ न देता प्रशासक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. आमच्याविरूद्ध खोट्या तक्रारी करण्यात आल्या. या तक्रारींमध्ये कोणतेही तथ्य नाही. आम्ही कोणत्याही चौकशीला तयार असल्याचे माजी सभापती राधाकिशन पठाडे यांनी दि. २४ रोजी सांगितले.
याविषयी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माजी आ. डॉ. कल्याण काळे यांच्यावर टीका केली. डॉ. काळे हे त्यांच्या मामांना पुढे करून तक्रारी करीत आहेत. ते १० वर्षे आमदार राहिले. परंतू त्यांना एकही सहकारी संस्था ना उभी करता आली ना चालविता आली. आता ते हरिभाऊ बागडे यांना वृद्ध नेता संबोधून त्यांची लाज काढत आहेत. यावरून काळे यांची संस्कृती काय असू शकते, हे लक्षात येते असा टोला पठाडे यांनी लगावला.
बाजार समितीला मुदतवाढ मिळू नये या हेतूने या तक्रारी करण्यात येत आहेत. यासंदर्भात चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत, असे पठाडे यांनी सांगितले. कोणतेही कर्ज न काढता, शासनाचे अनुदान न घेता गेल्या अडीच वर्षांत हरिभाऊ बागडे यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीने विविध विकासाची कामे केली असून पहिल्यांदाच ही अशी कामे झाल्याचा दावाही पठाडे यांनी केला.
ही अशी कामे बंद कशी होतील याचा प्रयत्न डॉ. काळे यांनी केला असून २०१० ते २०१५ पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूकही त्यांनी होऊ दिली नाही. देवगिरी साखर कारखान्याचेही त्यांनीच वाटोळे केले, असा आरोपही पठाडे यांनी केला. यावेळी माजी उपसभापती भागचंद ठोंबरे, संचालक गणेश पाटील दहीहंडे, श्रीराम पाटील शेळके, बाबासाहेब मुगदल आदींची उपस्थिती होती.