'गोडीने सांगत आहोत,अन्यथा गुन्हे दाखल करू';विभागीय आयुक्तांचा खाजगी रुग्णालयांना इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 05:45 PM2020-06-17T17:45:16+5:302020-06-17T17:45:38+5:30
रुग्ण दाखल करून न घेणाऱ्या खाजगी रुग्णालयांना विभागीय आयुक्तांचा इशारा
औरंगाबाद : खाजगी हॉस्पिटल्सबाबत दोन तक्रारी आल्या आहेत. प्रशासकीय यंत्रणा सध्या गोडीने सांगत आहे, जर ऐकले नाही, तर गुन्हे दाखल करु, असा इशारा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला. लवकरच खाजगी हॉस्पिटल्स व्यवस्थापन प्रतिनिधींची बैठक घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रेकर म्हणाले की, खाजगी हॉस्पिटल्ससंबंधी आलेल्या तक्रारीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्यास सांगितले आहे. व्हेंटिलेटर नाही म्हणून रुग्णाला दाखलच करून घ्यायचे नाही, हा चालूपणा खाजगी हॉस्पिटल्सनी करू नये. याबाबत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी एक सिस्टीम उभी केली आहे. जर एखाद्या कोरोनाच्या रुग्णाची दमछाक होत असेल व त्या रुग्णाला हॉस्पिटल्समध्ये व्हेंटिलेटर नसेल, तर त्याला आॅक्सिजन देऊन दाखल करून घ्या. त्याची माहिती प्रशासकीय यंत्रणेला कळवा. त्यानंतर प्रशासन त्याबाबत निर्णय घेईल.
रुग्ण दाखल करून घ्यावेच लागतील
खाजगी हॉस्पिटल्सना रुग्ण दाखल करून घ्यावेच लागतील. व्हेंटिलेटर असो किंवा नसो, आॅक्सिजनची व्यवस्था तर असतेच ना; परंतु काही ठिकाणी मुद्दामहून रुग्ण दाखल करून घेण्याबाबत टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी येत असून, येत्या आठवड्यात खाजगी हॉस्पिटल्स आणि प्रशासनाची बैठक होणार आहे. त्या बैठकीत विभागीय आयुक्त केंद्रेकर रुग्ण दाखल करून घेण्याबाबत मार्गदर्शक सूचना करणार आहेत.