'आम्ही शिवसेनेसोबत'; क्रांतीचौकात शिवसैनिकांचे बंडखोरांच्या विरोधात निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 02:51 PM2022-06-22T14:51:15+5:302022-06-22T14:53:30+5:30
क्रांती चौकात बंडखोरांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने केली
औरंगाबाद: शिवसेनेत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने संपूर्ण राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. विशेष म्हणजे, या बंडात सेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबादने मोठी रसद दिल्याचे समोर आल्याने स्थानिक नेतृत्वावर मोठी नामुष्की ओढवली आहे. या सर्व परिस्थितीमुळे अस्वस्थ झालेल्या शिवसैनिकांनी आज सकाळी क्रांती चौकात बंडखोरांच्या विरोधात निदर्शने केली.
शिवसेनेचे मातब्बर मंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थकांनी बंड केल्यानंतर त्याचे पडसाद म्हणून जिल्ह्यातील आमदारांच्या घरावर संतप्त शिवसैनिक हल्ला करतात की काय, अशी शक्यता होती. मंगळवारी रोहयो मंत्री संदीपान भूमरे यांचे घर आणि कार्यालयावर पोलीस बंदोबस्त होता; तर आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या कार्यालयांवर भयाण शांतता होती. दरम्यान, वेट ॲण्ड वॉच अशी भूमिका घेत सर्वांनी मंगळवारचा दिवस शांततेत घालविला.
पहिल्यांदाच बंडखोरीनंतर शिवसैनिक सायलेंट मोडवर पाहायला मिळाले. मात्र, आज सकाळी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौकात बंडखोरांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. विशेष म्हणजे, यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सर्वाधिक घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, राजू वैद्य, प्रतिभा जगताप, सुनिता देव, लता पगारे, सर्व महिला पदाधिकारी, युवासेनेचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
बालेकिल्ल्यातील बंडखोरीची ही असू शकतात कारणे...
ज्येष्ठ शिवसैनिकांनी सांगितले की, क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमात स्थानिक आमदारांना अजिबात महत्त्व दिले गेले नाही. जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनीच सर्व कार्यक्रमावर अधिराज्य गाजवले. आणखी एक उदाहरण द्यायचे झाल्यास ८ जून रोजी सांस्कृतिक मंडळावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित केली होती. या सभेतही दानवे यांनी माईकचा ताबा सोडला नाही. त्यामुळेही सेना आमदारांची नाराजी बरीच वाढली होती.