आम्ही डॉक्टर, सैनिक नाही; घाटीत बाऊंसर नियुक्त करण्याची निवासी डॉक्टरांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:09 PM2018-04-28T12:09:27+5:302018-04-28T12:11:58+5:30
घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धक्काबुक्कीच्या घटनेनंतर निवासी डॉक्टरांनी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानावर अविश्वास दर्शवित बाऊंसर नियुक्त करण्याची मागणी केली.
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धक्काबुक्कीच्या घटनेनंतर निवासी डॉक्टरांनी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानावर अविश्वास दर्शवित बाऊंसर नियुक्त करण्याची मागणी केली.
घाटीत १२ नोव्हेंबर रोजी मेडिसिन विभागात उपचार सुरू असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाणीची घटना घडली होती. पाच महिन्यांत बुधवारी रात्री दुसरी घटना घडली. या घटनेनंतर सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करीत डॉक्टरांनी आंदोलन पुकारले. बुधवारी रात्रीपासून गुरुवारी दिवसभरात निवासी डॉक्टरांच्या जवळपास वीस बैठका झाल्या. अधिष्ठातांच्या कक्षात आयोजित बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांसमोर अनेक धक्कादायक बाबी निवासी डॉक्टरांनी उघड केल्या. पोलिसांत तक्रार दिल्यास जीवितास धोका वाटतो. त्यामुळे यावेळी तक्रार दिली जाणार नाही. प्रशासनाने कारवाई करण्याची भूमिका डॉक्टरांनी घेतली.
धक्काबुक्की होत असताना महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे त्यांच्या प्रमुखांची बदली करण्यात यावी, बाऊंसर नियुक्त करावे, अशी मागणी केली. डॉक्टरांवर हल्ले होत असताना आता एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहिली जात आहे, असा संतप्त सवालही उपस्थित करण्यात आला.
आम्ही डॉक्टर, सैनिक नाही
नोव्हेंबरमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतरही काहीही सुधारणा झालेली नाही. आम्ही डॉक्टर आहोत, सैनिक नाही. त्यामुळे नातेवाईकांकडून धोका वाटला तर यापुढे पळून जाऊ. आंदोलन केल्याने वरिष्ठ डॉक्टर तंबी देत आहेत, असेही निवासी डॉक्टर म्हणाले.