"आम्ही सन्मान तर त्यांनी 'गेम' केला; संभाजीराजेंच्या अवमानामागे शरद पवारांची खेळी"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 06:01 PM2022-05-28T18:01:21+5:302022-05-28T18:15:45+5:30
महाविकास आघाडीच्या नादी लागून संभाजीराजेंचे नुकसान झाले
औरंगाबाद: सन्मान म्हणून भाजपने संभाजीराजेंना राज्यसभेत सहा वर्ष संधी दिली. मात्र, काही काळापासून त्यांनी स्वतःहून महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली असे प्रयत्न सुरु केले होते. शरद पवारांनी त्यांच्या पक्षाचा पाठिंबा जाहीर केल्यानंतर शिवसेनेने दुसरा उमेदवार देत पाठींब्यास नकार देणे म्हणजे संभाजीराजेंचा अवमान आहे. महाविकास आघाडीने त्यांचा ठरवून 'गेम' केला, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज केला. एका कार्यक्रमासाठी शहरात आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पुढे बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांनी राज्यसभेसाठी संभाजीराजेंना पाठिंबा जाहीर केला. पवार महाविकास आघाडीचे प्रणेते असल्याने त्यांनी इतर दोन्ही पक्षांना बोलून पाठिंबा दिला असेल. मात्र, त्यानंतर संजय राऊत यांनी शिवसेना दुसरा उमेदवार देणार असे जाहीर केले. अशा पद्धतीने संभाजीराजेंची कोंडी करून महाविकास आघाडीने त्यांचा अवमान केला. ही सर्व खेळी शरद पवार यांची आहे, असा आरोपही दरेकर यांनी यावेळी केला.
दरम्यान, सर्व राजकारणामागे भाजपाचीच खेळी असल्याचा दावा छत्रपती संभाजीराजे यांचे वडील शाहू छत्रपती महाराजांनी केला आहे, हे त्यांचे व्यक्तिगत मत असू शकते. भाजपने त्यांचा कायम सन्मान केला आहे. त्यांनी उमेदवारी मागितली असती तर आम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून निर्णय घेतला असता. मात्र, ते आमच्याकडे आलेच नाहीत, असा दावाही दरेकर यांनी केला.