‘चाललो’ म्हणायला हरकत नाही, पण जायचं कुठं ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 11:31 AM2019-02-22T11:31:42+5:302019-02-22T12:07:01+5:30
युतीसाठी मी प्रयत्न केले, अन् मलाच वाऱ्यावर सोडले
औरंगाबाद/जालना : भाजप- शिवसेनेने मला अडचणीत आणलंय. मी त्यांची भूमिका देशभर मांडतोय. पण मला मात्र ते डावलताहेत, हे योग्य नाही. खरं तर बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाखातर शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली. आता उद्धव ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून माझ्यासाठी दक्षिण- मध्य मुंबईची जागा सोडली पाहिजे. नाही तर ईशान्य मुंबईमधून मी लढू इच्छितो. ती तरी सोडावी, अशी विनवणी करून रिपाइं (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी २५ फेब्रुवारी रोजी प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून मी पुढील निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. ‘यांना’ चाललो म्हणायलाही हरकत नाही, पण जायचं कुठं हाही प्रश्न आहेच’ अशी हतबलताही त्यांनी औरंगाबादेत व्यक्त केली.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आठवले हे गुरुवारी बुलडाणा जिल्ह्यात गेले होते. तसेच जालना येथे समाजकल्याण खात्यांतर्गत दिव्यांगांना साहित्य वाटप करून ते दुपारी औरंगाबादला आले होते. दिल्लीकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केला.
ते म्हणाले, युती करताना मला विश्वासात तर घेतले गेले नाहीच. शिवाय माझ्यासाठी एकही जागा सोडली नाही. ही भूमिका नाराज करण्यासारखी आहे, धक्का देणारी आहे. जास्त जागा मागून युतीला अडचणीत न आणण्याची माझी भूमिका असतानाही मला एकही जागा न सोडण्याचा निर्णय हा अन्याय होय. त्यांच्या सिटिंगच्या जागा सोडायला ते तयार नाहीत. पण फिटिंग करण्याचं काम माझ्याकडे आहे, हे त्यांनी विसरू नये. मागच्या विधानसभा निवडणुकीत आठ जागा रिपाइं (ए) ला देण्यात आल्या होत्या. त्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. रिपाइंचे उमेदवार थोड्या थोड्या मतांनी पराभूत झाले. आता विधानसभेच्या कुठल्या जागा देणार हे माहीत नाही. आम्हाला टाळून त्यांना चालणार नाही. मग कुणाला निवडायचे व पाडायचे हे आम्ही ठरवू. रिपाइंच्या दोघांना सहा सहा महिने मंत्री करतो म्हणाले होते, तेही झाले नाही. त्यातील सहा महिने निघूनही गेले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
कमळ चिन्हावर लढणार नाही
मला एखादी जागा मिळाली तर मी कमळ चिन्हावर लढणार नाही. रिपाइंच्या चिन्हावरच लढेन. तसेच युतीने वा आघाडीने मला बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात लढा असे सांगितले तरी मी त्यांच्या विरोधात लढणार नाही. वंचित बहुजन आघाडीमुळे मतांच्या विभाजनाचा आपल्याला फायदा होणारच आहे, असे युतीच्या नेत्यांना वाटत असावे म्हणूनही मला डावलण्यात येत असावे, असा अंदाज आठवले यांनी व्यक्त केला.
...सोडणार नाही तुमचा पिच्छा
जालना येथे आपल्या मिश्कील स्वरात रामदास आठवले यांनी चारोळीच्या माध्यमातून युतीवर हल्ला केला. शिवसेना भाजपचे बरे चालले आहे... पण जरा आमचंही बघा. काहीही असले तरी मी नाही सोडणार तुमचा पिच्छा युती झाल्याने तुम्हारा हो गया अच्छा ... पण जागा सोडल्याशिवाय मी नाही सोडणार तुमचा पिच्छा... कारण मलाही लोकसभा लढविण्याची आहे इच्छा...
युतीसाठी मी प्रयत्न केले, अन् मलाच वाऱ्यावर सोडले
शिवसेना, भाजपाची युती व्हावी यासाठी मी प्रयत्न केले. मात्र, मलाच वाऱ्यावर सोडल्याची खंत रामदास आठवले यांनी गुरुवारी जालन्यात व्यक्त केली.