२२ वर्षे गुरूंच्या घरी राहिलो; गाण्याचा तेवढा गुण नसताना गुरूंमुळेच गायक बनलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 04:32 PM2020-09-05T16:32:29+5:302020-09-05T16:51:01+5:30

ज्या व्यक्तीला शिक्षक मिळतो. तो फार भाग्यवान असतो. शिक्षकी पेशा हा धर्म समजून फार प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना ज्ञानदान करावे लागते. त्यातून गुरू, विद्यार्थी आणि देशाची उन्नती होत असते. त्यामुळे गुरू हा श्रेष्ठ आहे. 

We lived in Guru's house for 22 years; I became a singer only because of Guru | २२ वर्षे गुरूंच्या घरी राहिलो; गाण्याचा तेवढा गुण नसताना गुरूंमुळेच गायक बनलो

२२ वर्षे गुरूंच्या घरी राहिलो; गाण्याचा तेवढा गुण नसताना गुरूंमुळेच गायक बनलो

googlenewsNext
ठळक मुद्देमराठवाड्यात संगीताचा प्रसार केला गुरूंनी स्वत: शिकून विद्यार्थ्यांना दिली आयुष्यभराची शिदोरी

- राम शिनगारे

औरंगाबाद : माझ्या घरात चुलते भावगीत गात. घरात साधारण गाण्याची परंपरा असताना सुरुवातीच्या काळात गुरूंच्या मिळालेल्या मार्गदर्शनामुळे मी घडलो. माझ्यात गाण्याचा तेवढा गुण नसताना गुरूंमुळेच गाण्याचा विकास झाला. गायक बनलो. गायकीच्या कक्षा रुंदावल्या, अशा शब्दांत प्रसिद्ध शास्त्रीय गायक नाथराव नेरळकर यांनी शिक्षकांचा गौरव केला.

गुंजकर गुरुजींच्या गुरुकुलात घडलो
नांदेड येथील गानमहर्षी अण्णासाहेब गुंजकर ऊर्फ अ. ह. गुंजकर हे माझे गुरू. स्वयंभू असे गुरू होते. त्यांना कोणी गुरू नव्हता. त्यांनी निजामाच्या काळात स्वत: अध्ययन करून उच्च प्रतीचे संगीताचे ज्ञान विद्यार्थ्यांना दिले. त्यांच्या तालमीत तयार झालेल्या शिक्षकांनी संपूर्ण मराठवाड्यात संगीताचा प्रचार-प्रसार करण्याचे मोठे काम केले. संगीत क्षेत्रात गुंजकर गुरुजींविषयी संपूर्ण मराठवडाभर आदराची भावना आहे.  पुण्यासह काही ठिकाणी संगीतविषयक काम करणाऱ्या संस्था त्यांच्या नावाने पुरस्कार देतात. ही बाब त्यांच्या कार्याची महती देणारी आहे. असे गुरु मला लाभले हे माझे भाग्य समजतो. 

मराठवाड्यात संगीत रुजवले
गुंजकर गुरुजींनी मराठवाड्यात संगीत रुजविण्याचे काम केले. त्यांचे सारंगी, दिलरुबा, सतार, आदी १६ वाद्यांवर प्रभुत्व होते. त्यांच्याकडून संगीताची विविध संमेलने भरविण्यात आली. मराठवाड्याबाहेरील प्रसिद्ध घराण्यातील गायकांना गाण्यासाठी आणले. यातून विद्यार्थ्यांमध्ये संगीत रुजवत रोपटे लावले. या रोपट्याचे पुढे वटवृक्षात रूपांतर झाले. त्यांच्या शिष्य परिवारात माझ्यासह उत्तमराव अग्निहोत्री, रमेश कानवले, कांता कांडलीकर, नलिनी देशपांडे, अंबूताई नांदेडकर, श्याम गुंजकर, मनोहराव कांडलीकर, डॉ. सा. रा. गाडगीळकर, केशवकृष्ण शिरवाडकर अशा नानाविध विद्यार्थ्यांचा समावेश होता. आम्ही औरंगाबादमध्ये  त्यांच्या नावाने ‘डॉ. अण्णासाहेब गुंजकर संगीत महोत्सवा’चे आयोजन करतो. आपल्या गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक संधी आहे, असे मी मानतो. 

नांदेडी घराण्याचा जन्म
गुंजकर गुरुजींनी दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीवर आतापर्यंत शेकडो शिष्य तयार केले. या शिष्यांनी संगीताचा प्रचार-प्रसार सर्वदूर केला.  गायकीमध्ये अनेक घराणी आहेत. त्यामुळे मीसुद्धा नांदेडी घराणे अभिमानाने लावतो. नांदेडमधील मूळ रहिवासी असतानाच  त्याठिकाणीच संगीतात निपुण होण्याचा योग घडला आहे. हे महत्त्वाचे आहे. गुरुजींनी संगीताचे रोपटे मराठवाड्यात रुजविण्याचे काम केले. आम्ही शिष्यांनी त्याचे वटवृक्षात रूपांतरण करण्याचा प्रयत्न नक्कीच केला आहे. 


गाण्याचेच नव्हे, इतरही ज्ञान दिले
गुंजकर गुरुजी शास्त्रीय, नाट्यासह इतर गायनात पारंगत होते. त्यासोबतच त्यांनी सतार, तबला, पखवाज, दिलरुबासह इतर वाद्य शिकले. स्वत: शिकल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांनाही शिकविले. यात शकुंतलाबाई वाघमारे सतार शिकल्या. असे अनेक उपक्रम गुरुजींनी कृतीतून दाखवून दिले. 

२२ वर्षे गुरूंच्या घरी राहिलो
आमचं कुटुंब मूळचं नांदेडचं. १९४६-४७ साली प्लेगची साथ होती. त्यामुळे गावच्या गावं खाली झाली. आमचं कुटुंबही शहराबाहेर राहणारे चुलते धोंडू शास्त्री यांच्याकडे राहण्यास गेलं. चुलते भावगीत गायचे. त्यामुळे त्यांच्याकडे हार्मोनियम होते. त्यांच्या मुलासोबतच गुंजकर गुरुजींची ओळख झाली. तेव्हा मला गुरू सापडला. तो आयुष्याच्या शेवटपर्यंत कायम राहिला. या गुरूच्या घरीच २२ वर्षे काढली. 

नाट्यसंगीत, शास्त्रीय संगीतात आम्हा शिष्यांना पारंगत केले. त्यांनी केलेल्या संस्कारातून आणि त्यांच्या ज्ञानदानातून अनेक विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही घडले. या शिक्षकांनी मराठवाड्यात संगीताचा प्रचार-प्रसार करण्याचे मोठे काम केले.    
- नाथराव नेरळकर, प्रसिद्ध शास्त्रीय गायक

Web Title: We lived in Guru's house for 22 years; I became a singer only because of Guru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.