आम्ही मराठी पोरं हुश्शार; महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थी अंतराळात उपग्रह सोडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 01:40 PM2021-01-15T13:40:03+5:302021-01-15T13:42:32+5:30
Students in municipal schools will launch satellites एपीजे अब्दुल कलाम नॅशनल फाउंडेशनच्या स्पेस रिसर्च इंडियाअंतर्गत शालेय विज्ञान शोध प्रकल्पासाठी निवड
औरंगाबाद : एपीजे अब्दुल कलाम नॅशनल फाउंडेशनच्या स्पेस रिसर्च इंडियाअंतर्गत शालेय विज्ञान शोध प्रकल्पाद्वारे १०० उपग्रह तयार करण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी महापालिकेच्या शाळेतील १० विद्यार्थ्यांची निवड झाली असून, त्यांचे ऑनलाईन प्रशिक्षण सध्या सुरू आहे. औरंगाबादकरांसाठी ही गौरवाची बाब मानली जात असून, मराठी शाळेतील पोरांना अंतराळज्ञान मिळणार आहे.
हे सर्व उपग्रह ७ फेब्रुवारीला अंतराळात सोडून जागतिक विक्रम स्थापित केला जाणार आहे. यासाठी देशातील १०० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यात महापालिकेच्या शाळांतून १० विद्यार्थ्यांची निवड झाल्याचे महापालिकेच्या शिक्षण विभागाने कळविले आहे. आंतरराष्ट्रीय फाऊंडेशनची स्थापना हाऊस ऑफ कलामतर्फे ११ ऑक्टोबर २०१५ रोजी करण्यात आली. या संस्थेचा उद्देश विद्यार्थ्यांमधील शिक्षण व कौशल्य, व्यवस्थापन, ज्ञान विकसनाची क्षमता, नोकरीच्या संधी शोधणे, संशोधन विकसित करणे हा आहे. महाराष्ट्रातील मुलांसाठी याअंतर्गत होणारी सर्व सत्रे मराठी भाषेतून होत आहेत. उपग्रह बनविण्यापासून ते अवकाशात प्रक्षेपित करीपर्यंत सर्व माहिती शालेय विद्यार्थ्यांना मराठीमधून दिली जात आहे.
या विद्यार्थ्यांची झाली आहे निवड
निवड झालेल्या विद्यार्थ्यांत उस्मानपुरा येथील प्रियदर्शनी शाळा, हर्सूल, मुकुंदवाडी, एन-७ या शाळांमधील सोनाली यादव, सूरज जाधव, विशाल वाहुळ, गुलनाज सय्यद, राणी चोपडे, नंदिनी मोटे, प्रतिमा म्हस्के, साहिल केदारे, इरशाद खान व रूपाली गायकवाड या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही सर्व मुले रामेश्वरम येथे उपग्रह प्रक्षेपणासाठी जाणार आहेत. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल फाउंडेशनच्या स्पेस रिसर्च या फाऊंडेशनचे समन्वयक मिलिंद चौधरी आणि मनीषा चौधरी यांनी या उपक्रमाचे नियोजन केले आहे.
३८ हजार मीटर उंचीवर सोडणार उपग्रह
जगात सर्वांत कमीत कमी २५ ग्रॅम वजनाचे ते जास्तीत जास्त ८० ग्रॅम वजनाचे १०० उपग्रह बनवून आणि त्यांना ३५ ते ३८ हजार मीटर उंचीवर सायंटिफिक बलूनद्वारे प्रक्षेपित केले जाणार आहे. यामध्ये पालिका विद्यार्थ्यांंचाही सहभाग असणार आहे. या उपक्रमासाठी उपायुक्त सुमंत मोरे, शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे व सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार हे मार्गदर्शन करीत आहेत.