आम्ही सहामाही परीक्षेत उत्तीर्ण झालो, आता वार्षिक परीक्षेत नंबर वन मिळवू : एकनाथ शिंदे
By बापू सोळुंके | Published: January 5, 2023 07:56 PM2023-01-05T19:56:38+5:302023-01-05T19:57:28+5:30
महा एक्स्पोच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन केले मार्गदर्शन
औरंगाबाद : स्थानिक उद्योजकांनी देशातच नव्हे, तर देशाबाहेरही ओळख निर्माण करावी. आधीच्या सरकारच्या काळात ३६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होती. आम्ही ७० हजार कोटींच्या गुंतवणुकीस मंजुरी दिली. परिणामी लाखो लोकांना रोजगार उपलब्ध झाला. आम्ही सहामाही परीक्षेत उत्तीर्ण झालो आणि वार्षिक परीक्षेत नंबर वन मिळवू, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
मराठवाडा स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर असोसिएशनच्या (मसिआ) चार दिवसीय महा ॲडव्हांटेज महा एक्स्पोचे उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी झाले. या समारंभात ऑनलाइन मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्याेगमंत्री, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकारमंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील, आ. हरिभाऊ बागडे, आ. रमेश बोरनारे, आ. उदयसिंह राजपूत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, मसिआचे अध्यक्ष किरण जगताप, महा एक्स्पोचे संयोजक अभय हंचनाळ यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री म्हणाले की, विमानातील बिघाडामुळे मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना महा एक्स्पोच्या उद्घाटनासाठी येता आले नाही. लघू आणि सूक्ष्म उद्योजकांनी राज्यात, देशात सुंदर प्रदर्शन केल्याने डिसेंबर २०२२च्या अहवालानुसार देशाच्या उत्पादनाचा उच्चांक गाठला आहे. राज्यातही कोट्यवधींची उलाढाल होत आहे. स्थानिक उद्योजकांनी देशातच नव्हे, तर देशाबाहेरही ओळख निर्माण करावी. आधीच्या सरकारमध्ये कुणाचेही एकमत होत नव्हते. आता सर्व भागांसाठी निर्णय घेतले जातात. केवळ मोठ्या नेत्यांच्या भागांसाठीच दुटप्पी निर्णय आम्ही घेतले नाहीत, अशी टीकाही त्यांनी विरोधकांवर केली. तसेच महाराष्ट्र सरकार सदैव उद्योजकांच्या सोबत आहे. महाराष्ट्रात जी-२० बैठकांच्या निमित्ताने जगभरातून लोक येणार आहेत. त्यांना आपली औद्योगिक ताकद दाखवावी, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्योजकांना केले.
पालकमंत्री भुमरे, सहकारमंत्री सावे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना किरण जगताप यांनी लघू उद्योगांच्या अडचणी आणि प्रश्न मांडले.