'आमची सहनशिलता संपली'; निर्बंधाच्या विरोधात व्यापाऱ्यांनी मागितली सामूहिक आत्मदहनाची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 06:43 PM2021-04-07T18:43:00+5:302021-04-07T18:44:50+5:30
२५ दिवसाच्या लॉकडाऊन विरोधात व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
औरंगाबाद : मागील वर्षीच्या प्रदीर्घ लॉकडाऊनमुळे आधीच व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यात आता २५ दिवसाचे लॉकडाऊन. यामुळे आमची सहनशिलता संपली असून दुकान उघडण्याचे आदेश जाहीर करा किंवा व्यापाऱ्यांना सामूहिक आत्मदहन करण्याची परवानगी द्या, अशी पोटतिडकीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापाऱ्यांनी दिले.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या '' ब्रेक द चेन'' चा बुधवारी दुसरा दिवस होता. २५ दिवसाच्या लॉकडाऊन विरोधात व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. ती खदखद आज बाहेर पडली. सिडको एन ५ व एन ६ येथील सिडको प्रगती व्यापारी संघटनेने सकाळी आविष्कार कॉलनी मुख्य रस्त्यावर साखळी आंदोलन केले. काहीनी आपल्या बंद दुकाना समोर उभे राहून लॉकडाऊनच्या निर्णयाचा कडाडून विरोध केला. काळ्या रंगाचे फलक सर्वानी हाती घेतले होते. लॉकडाऊन रद्द करा अशी मागणी करण्यात आली होती.
दुपारी १२.३० वाजता कॅटचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजय शहा, मराठवाडा चेंबरचे अध्यक्ष प्रफुल्ल मालानी, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, लक्ष्मीनारायण राठीं, विजय जयस्वाल आदींनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन दिले. यात म्हटले आहे की, मागील वर्षी प्रदीर्घ लॉकडाऊन करण्यात आला त्या नंतर शहरात १० दिवसाचा लॉकडाऊन करण्यात आला. त्यावेळीस व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. बहुतांश व्यापारी आज कर्जबाजारी आहेत. याकाळात केंद्र व राज्य सरकारने व्यापाऱ्यांसाठी कोणतेही आर्थिक पॅकेज जाहीर केल नाही. तरीपण व्यापाऱ्यांनी आयकर, जीएसटी भरला, मनपाचा मालमत्ताकर, वाढीव लाईट बील आधी भरले. एकही कर्मचाऱ्याला या काळात नोकरी वरून काढून टाकण्यात आले नाही. मात्र, आता कर्जाचा बोजा सहन होत नाही, आता पुन्हा लॉकडाऊन मुळे आमची मानसिकता व आर्थिक परिस्थिती खचत चालली आहे. सरकारने सर्व दुकाने उघडण्यास मंजुरी द्यावी किंवा सामूहिक आत्मदहन करण्यास परवानगी द्यावी, असे स्पष्टपणे निवेदनात म्हटले असल्याचे प्रफुल्ल मालानी यांनी सांगितले.
वीकेंड लॉकडाऊनचे पालन करू
राज्य सरकारने जो पहिला आदेश काढला त्यात वीकेंड ( शनिवार, रविवार) लॉकडाऊन करण्याचा उल्लेख होता. रात्री ८ वाजेनंतर संचारबंदी तसेच मास्क न लावलेल्या ग्राहकांना दुकानात प्रवेश देण्यात येणार नाही, म्हणजे अंशतः लॉकडाऊन व्यापाऱ्यांना मान्य आहे. पण २५ दिवस संपूर्ण लॉकडाऊन यास आम्ही कडाडून विरोध करत राहू.
- जगन्नाथ काळे, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ