‘हम दो, हमारे दो’ऐवजी ‘हम दो, हमारा एक ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:10 AM2019-07-11T00:10:55+5:302019-07-11T00:11:25+5:30
पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचा आवश्यक असलेला वेळ, वाढती महागाई, शिक्षणाचा वाढत जाणारा खर्च, अशा विविध कारणांमुळे आता ‘हम दो, हमारे दो’ऐवजी आता ‘हम दो, हमारा एक’ याकडे नागरिकांचा कल वाढतो आहे. विशेषत: शहरामध्ये या नव्या संकल्पनेचे प्रमाण अधिक आहे.
औरंगाबाद : पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचा आवश्यक असलेला वेळ, वाढती महागाई, शिक्षणाचा वाढत जाणारा खर्च, अशा विविध कारणांमुळे आता ‘हम दो, हमारे दो’ऐवजी आता ‘हम दो, हमारा एक’ याकडे नागरिकांचा कल वाढतो आहे. विशेषत: शहरामध्ये या नव्या संकल्पनेचे प्रमाण अधिक आहे.
शहर असो की ग्रामीण भाग, पूर्वी कुटुंबात एकापेक्षा जास्त अपत्ये असण्याचे प्रमाण अधिक होते. मात्र, वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक समस्या निर्माण होत असल्याची बाब पुढे आली. त्यातून छोटे कुटुंब ठेवण्यासंदर्भात विविध माध्यमांतून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. ‘हम दो, हमारे दो’ ही संकल्पना मोठ्या प्रमाणात रुजली. यामध्ये आता आणखी एक पाऊल पडले आहे. एकच अपत्य ठेवण्याकडे कल वाढत आहे. शिवाय चौथ्या राष्ट्रीय कुटुंब कल्याण सर्वेक्षणातही ‘हम दो, हमारा एक ’ म्हणणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढल्याची बाब पुढे आली होती.
शहरात अनेक दाम्पत्ये आहेत, ज्यांना एकच मूल आहे. मुलगा असो की मुलगी, एकच अपत्य ठेवण्याचा निर्णय घेऊन पाल्याच्या सर्वांगीण वाढीकडे लक्ष दिले जात आहे. एक अपत्य ठेवण्यामागे अनेक कारणे आहेत. लग्नाचे वाढते वय, त्यामुळे प्रसूतीदरम्यान निर्माण होणारी गुंतागुंत, करिअर हेदेखील त्यातील कारण आहे. जिल्ह्यात वर्षभरात १२ हजार कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया झाल्या. मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या की, छोटे कुटुंब ठेवण्याचा कल वाढत आहे. विशेषत: कु टुंबनियोजन शस्त्रक्रियांमध्ये महिलांचा सहभाग अधिक आहे.
मुलगा सीए झाला
मुलगा असो की मुलगी, एकच अपत्याचा निर्णय मी आणि पत्नी आशा हिने मिळून घेतला होता. त्याच्या पालनाकडे चांगल्या प्रकारे लक्ष देता येईल, ही त्यामागील भूमिका होती. एकच मुलगा आहे. तो आता सीए झाला असून, सध्या आॅस्ट्रेलियात आहे. छोट्याशा कुंटुबामुळे आम्ही अंत्यत समाधानी आहोत.
-संजय औरंगाबादकर
काळाची गरज
लहान कुटुंब हे नेहमी आनंदी असते. त्यामुळेच ‘लहान कुटुंब, आनंदी कुटुंब’ असे म्हटले जाते. एकच मुलगा आहे. छोटे कुटुंब ही काळाची गरज आहे. त्यामुळे पती आणि मी दोघांनी एकत्रित निर्णय घेतला. मुलाच्या सर्वांगीण वाढीसाठी आम्ही प्रयत्न करतो.
-उज्ज्वला ज्ञानेश्वर बनसोड