‘गणेश मेळ्यांतून आम्ही स्वातंत्र्याची गाणी म्हणत असू’: ताराबाई लड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:06 AM2021-08-14T04:06:32+5:302021-08-14T04:06:32+5:30
(स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरू ) औरंगाबाद: औरंगपुऱ्याच्या पलीकडे त्यावेळी औरंगाबाद नव्हतं. इकडे पैठणगेटच्या पुढे सारी झाडं होती. शिक्षणात ...
(स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरू )
औरंगाबाद: औरंगपुऱ्याच्या पलीकडे त्यावेळी औरंगाबाद नव्हतं. इकडे पैठणगेटच्या पुढे सारी झाडं होती. शिक्षणात मुलींचं प्रमाण नगण्य. आमच्या बाजूला माणिकचंद पहाडे राहत होते. आशाताई वाघमारेही याच परिसरात म्हणजे शाहगंज परिसरात राहत होत्या. एक वातावरण मिळत गेलं. तसं आम्ही लहान असल्यामुळे काही कळत नव्हतं. माणिकचंद पहाडे, आशाताई वाघमारे जसं सांगत होते, तसं करीत होतो. गणेशोत्सवात बाळगोपाळ, बलभीम, रघुवीर या मेळ्यांची धूम असायची. आम्ही सिनेमातील गाण्यांच्या चालीवर काव्यरचना करून स्वातंत्र्याची गाणी गात होतो......
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी ताराबाई लड्डा जसं जसं आठवत होतं, तसं सांगत होत्या. ताराबाईंचा जन्म १९२९चा. त्यांचे पती बन्सीलाल लड्डाही स्वातंत्र्याच्या लढ्यात अग्रभागी राहिलेले. ताराबाईंनी राज्य व केंद्र सरकारची पेन्शन घेतलेली नाही. त्या नोकरीत होत्या. १९८८ साली निवृत्त झाल्या. ती पेन्शन मात्र त्यांना मिळते.
मराठवाड्यावर निजामी राजवट असल्यामुळे मुख्यत: हा लढा निजामाच्या विरोधातला होता. ताराबाई सांगत होत्या, त्यावेळी वर्तमानपत्रे नव्हती. हैदराबादहून ‘निजाम विजय’येत होता. पुण्या-मुंबईकडची वर्तमानपत्रे चोरून-मारून आणावी लागत होती. गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काबरा, संग्रामसिंह चौहान, द्वारकादास पटेल, नाना जेधे, भीमराव कुळकर्णी, लालचंद मालानी, रतिलाल जरीवाला, चंदाबेन जरीवाल आदींचा नामोल्लेख करीत ताराबाईंनी लढ्यातले अनेक प्रसंग उभे केले.
मुख्यत: भूमिगत राहून त्यांनी काम केले. त्यावेळी साधे फोनही लवकर उपलब्ध नव्हते. खबर द्यावी लागायची. मग ती चिठ्ठी कशी पोहोचवावी लागत असे, हे त्यांनी सांगितले. येवल्याच्या कॅम्पमध्ये पती बन्सीलाल लड्डा यांना कानाखाली गोळी लागली होती, याची आठवण त्यांनी केली.
..............................................
कॉम्रेड मनोहर टाकसाळ म्हणतात;
स्वातंत्र्याचा जयजयकार करतो पण.......
१५ ऑगस्टपासून स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरु होत आहे. मी स्वातंत्र्याचा जयजयकार करतो. स्वातंत्र्यासाठी लढलेल्या तमाम शहिदांना, सैनिकांना मानाचा मुजरा करतो, असे सांगत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड मनोहर टाकसाळ यांनी ज्या उद्देशांसाठी स्वातंत्र्यप्राप्ती झाली, ते उद्देश सफल होताना दिसत नसल्याचे दु:ख व्यक्त केले.
कॉ. मनोहर टाकसाळ हे बीड जिल्ह्याचे. ते त्यावेळी लहान होते. त्यांचे मूळ गाव राजुरीत पिराजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्याच्या या लढ्यात ओढले गेले. आणि कार्य करू लागले. तेथेच त्यांच्यावर साम्यवादाचे संस्कार झाले. तेव्हापासून त्यांनी हाती धरलेला लालबावटा सोडला नाही.
कॉ. टाकसाळ यांना राज्य आणि केंद्र सरकारची पेन्शन मिळते, ते म्हणाले, स्वातंत्र्य सैनिकांचे स्वप्न तसेच राहिले. गांधी-नेहरू लढले. भगतसिंग फासावर गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले. पण संविधानातील मूल्ये उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय संपुष्टात येत आहे. इथे लोकशाहीची रोज हत्या होत आहे.