राज्यपाल हवेत भाजपचे पूर्णवेळ काम करणारे कार्यकर्ते नकोत; सुषमा अंधारे आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 05:07 PM2022-11-19T17:07:04+5:302022-11-19T17:07:49+5:30
केंद्र सरकारने राज्यपाल दिलेत की, ठरवून महाराष्ट्राची बदनामी करणारे भाजप कार्यकर्ते
औरंगाबाद: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानाने पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. याचे पडसाद आता उमटत असून अनेकांनी टीकेची झोड उठवली आहे. राज्यपाल कोश्यारी यांना काम करण्यापेक्षा वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणे जास्त आवडते. त्यांच्या विधानाने कायम महाराष्ट्राची मान खाली गेली आहे. माझी तथाकथित महाशक्ती आणि केंद्र सरकारला विनंती आहे की, आम्हाला राज्यपाल हवेत भाजपचे पूर्णवेळ काम करणारे कार्यकर्ते नकोत, अशी टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली.
विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षांत समारंभात आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, माजी मंत्री शरद पवार आणि केंद्रीय वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते डिलीट पदवीने सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी,'आता जर विचारले तुमचा हिरो कोण? आदर्श कोण ? तर कोठे बाहेर जाण्याची गरज नाही. येथे महाराष्ट्रातच तुम्हाला हिरो मिळतील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाचे झाले, डॉ. आंबडेकर ते गडकरी हे आजच्या युगाचे आदर्श आहेत,' असे मत व्यक्त केले. यावरून आता वादंग उठले असून अनेकांनी राज्यपालांवर टीका केली आहे. याबाबत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील आक्रमक भूमिका घेत टीका केली.
सुषमा अंधारे म्हणाल्या, राज्याचे पालक म्हणून काम करण्यापेक्षा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणे जास्त आवडते. त्यांच्या विधानाने महाराष्ट्राची मान खाली गेली आहे. कायम महाराष्ट्रावर टीका केली. येथील महापुरुषांना कमी लेखले आहे. यापूर्वी देखील त्यांनी शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाचे प्रणेते फुले दाम्पत्य, मराठी माणसावर टीका केली आहे. माझी तथाकथित महाशक्ती आणि केंद्र सरकारला विनंती आहे की, आम्हाला राज्यपाल हवेत भाजपचे पूर्णवेळ काम करणारे कार्यकर्ते नकोत. केंद्र सरकारने राज्यपाल नेमून दिलेत कि ठरवून टीका करणारा तुमचा माणूस पाठवला आहे, असा सवाल ही अंधारे यांनी केला.