'आम्हाला न्याय हवा', सोमनाथच्या आईचा आक्रोश; शवविच्छेदनानंतर पार्थिव परभणीकडे रवाना
By संतोष हिरेमठ | Updated: December 16, 2024 12:15 IST2024-12-16T12:14:31+5:302024-12-16T12:15:02+5:30
सकाळी साडेअकरा वाजता शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पार्थिव रुग्णवाहिकेने परभणीकडे रवाना झाले.

'आम्हाला न्याय हवा', सोमनाथच्या आईचा आक्रोश; शवविच्छेदनानंतर पार्थिव परभणीकडे रवाना
छत्रपती संभाजीनगर : परभणी येथे दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आला. शवविच्छेदन होत असताना सोमनाथच्या आईने आणि नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. मुलाच्या मृत्यूप्रकरणी न्याय देण्याची मागणी सोमनाथच्या आईने केली.
सकाळी साडेअकरा वाजता शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पार्थिव रुग्णवाहिकेने परभणीकडे रवाना झाले. यावेळी रुग्णवाहिकेसोबत मोठा पोलीस बंदोबस्त होता. घाटीत शवविच्छेदनगृह परिसरात आंबेडकरी चळवळीतील नेते, पदाधिकारी यांच्यासह युवकांनी मोठी गर्दी केली. यावेळी सोमनाथ अमर रहे अशा घोषणांसह पोलीस विरोधातील घोषणाही देण्यात देण्यात आल्या.
शवविच्छेदनापूर्वी तरुणाच्या मृतदेहाचे सीटी स्कॅन
परभणी येथे न्यायालयीन कोठडीत मृत्यू पावलेला तरुण सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी (३६, रा. भोसरी, जि. पुणे, ह.मु. शंकरनगर, परभणी) याचा मृतदेह इन कॅमेरा शवविच्छेदनासाठी रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात दाखल झाला. घाटीत मृतदेह दाखल झाल्यानंतर सर्वप्रथम सीटी स्कॅन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनगृहात दाखल करण्यात आला. परंतु, शवविच्छेदनापूर्वी रक्ताच्या नातेवाइकांनी मृतदेहाची ओळख पटवून घेणे आवश्यक आहे. सोमनाथचे आई-वडील आणि इतर कोणी अगदी जवळचे नातेवाईक घाटीत आलेले नव्हते त्यामुळे रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन सुरू झालेले नव्हते. रक्ताचे नातेवाईक उशिरा आल्यानंतर सर्व प्रक्रिया पार पडली. त्यानंतर सोमवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले.
शहरासह परभणीहून कार्यकर्ते दाखल, जोरदार घोषणा
शवविच्छेदनासाठी सोमनाथचा मृतदेह घाटीत आणण्यात आल्याची माहिती मिळताच शवविच्छेदनगृह परिसरात शहरातील आंबेडकरी चळवळीतील नेते, पदाधिकारी यांच्यासह युवकांनी मोठी गर्दी केली. यामुळे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सूर्यवंशी यास न्याय मिळालाच पाहिजे, यासह विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला. अनेकांनी मृत्यूविषयी तीव्र संताप व्यक्त केला. परभणी येथील पदाधिकारी व कार्यकर्ते घाटीत दाखल झाले.
नायब तहसीलदारांसह डाॅक्टरांचे पथक
नायब तहसीलदार, पोलिस अधिकारी यांच्यासह ५ डॉक्टरांचे पथक नेमण्यात आले. शवविच्छेदनासाठी मृतदेह दाखल होण्यापूर्वी अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे यांनी शवविच्छेदनगृहाला भेट देत आढावा घेतला.
मारहाणीमुळे मृत्यू
पोलिसांनी मारहाण केल्यामुळे सोमनाथचा मृत्यू झाला आहे, असा आमचा आरोप आहे. शरीरावर मारहाणीच्या जखमा आहेत. तो विधिच्या (लाॅ) शिक्षणासाठी परभणीत आला होता.
- प्रा. अनिल कांबळे