'संशोधनासाठी गाईड द्या!', पत्रकारितेच्या संशोधक विद्यार्थ्यांचे विद्यापीठात बेमुदत उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 12:10 PM2023-03-12T12:10:37+5:302023-03-12T12:12:35+5:30
फेलोशिपधारक व पेट-२०२१ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आंतरविद्या शाखे अंतर्गत रिसर्च गाईड देण्याची मागणी
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागात एम.िफलचे संशोधन पूर्ण केलेल्या फेलोशिपधारक व पेट २०२१ उत्तीर्ण संशोधक विद्यार्थ्यांना विद्यापीठाने पीएच.डीसाठी आंतरविद्याशाखेअंतर्गत रिसर्च गाईड (संशोधन मार्गदर्शक) तत्काळ उपलब्ध करून द्यावेत, या मागणीसाठी शनिवारपासून (11मार्च) संशोधक विद्यार्थ्यांनी बेमुदत उपोषण विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर सुरू केले आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस असून मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही, यावर आंदोलक संशोधक विद्यार्थी ठाम आहेत.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागात एम.फिल करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी), राजर्षी छत्रपती शाहू महाराज संशोधन मानव विकास संस्था पुणे (सारथी), महात्मा ज्योतिराव फुले संशोधन व प्रशिक्षण नागपूर (महाज्योती), राजीव गांधी राष्ट्रीय फेलोशिप, मौलाना आजाद राष्ट्रीय फेलोशिप पीएच.डी साठी JRF ते SRF अशी सलग करण्यात आलेली आहे. परंतु जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागात रिसर्च गाईड (संशोधन मार्गदर्शक) उपलब्ध नसल्याने फेलोशिपधारकांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र. कुलगुरू, कुलसचिव यांच्याकडे वारंवार मागणी करूनही एम.फिल पूर्ण करणाऱ्या फेलोशिधारक व पेट-२०२१ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रिसर्च गाईड मिळाले नाहीत. त्यामुळे फेलोशिपधारकासह पेट उत्तीर्ण संशोधक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना तत्काळ रिसर्च गाईड उपलब्ध करून द्यावेत, या मागणीसाठी संतापलेल्या संशोधक विद्यार्थ्यांनी शनिवारपासून (११ फेब्रुवारी) विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. रिसर्च गाईड मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहील यावर संशोधक विद्यार्थी गणेश शिंदे, नागेश सोनोने, भास्कर निकाळजे, विद्या वाघमारे, श्रद्धा खरात, लक्ष्मीकांत जाधव, सुमेध हिवराळे, एम. एल. शेळके आदी ठाम आहेत.
गाईड देणे विद्यापीठाची जबाबदारी
विद्यापीठ प्रशासनाने पाली अॅण्ड बुद्धीझम, लिबरल आर्टस्, फाईन आर्टस्, ग्रंथालय व माहितीशास्त्र, ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास, फुले-आंबेडकर विचाराधारा, शिक्षणशास्त्र इत्यादी विषयात आंतरविद्याशाखे अंतर्गत पीएच.डीसाठी रिसर्च गाईड उपलब्ध करून दिले आहेत. परंतु जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागातील संशोधकांना गाईड दिले नाहीत. विद्यार्थ्यांना रिसर्च गाईड उपलब्ध करून देणे ही विद्यापीठाची जबाबदारी आहे. आंतरविद्या शाखेअंतर्गत इतर विषयाच्या रिसर्च गाईडच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी संशोधकांनी केली होती मात्र यावर विद्यापीठ प्रशासन गांभीर्याने विचार करत नाही, असा संताप आंदोलकांनी व्यक्त केला.