'आमच्याच घरी झालो आम्ही पाहुणे'; सून जेवण देत नाही, मुलगा काही बोलत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2020 11:30 AM2020-11-15T11:30:23+5:302020-11-15T11:35:02+5:30
मुलगा आणि सुनेचे घरातील ज्येष्ठ नागरिकांशी न पटणे, ही समस्या आज अनेक घरांमध्ये दिसून येते.
- रुचिका पालोदकर
औरंगाबाद : आमचे हात- पाय आता थकले. मुलगा आणि सुनेवर आम्ही पूर्णपणे अवलंबून आहोत. मात्र सून आम्हाला विचारत नाही, औषध- जेवण वेळेवर देत नाही आणि मुलगा मात्र काहीच न बोलता मूग गिळून गप्प बसतो, अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण लॉकडाऊनमध्ये लक्षणीय वाढले आहे.
मुलगा आणि सुनेचे घरातील ज्येष्ठ नागरिकांशी न पटणे, ही समस्या आज अनेक घरांमध्ये दिसून येते. मात्र मुलगा आणि सून दोघेही कामानिमित्त घराबाहेर गेले की त्यांना त्यांचे स्वातंत्र्य मिळते आणि ज्येष्ठांना घरात मुक्त श्वास घेता येतो. परंतु लॉकडाऊनदरम्यान सगळे घरीच असल्यामुळे घरातील भांडणे विकोपाला जाऊ लागली. याचीच परिणीती म्हणून पोलीस आयुक्तालयातील ज्येष्ठ नागरिक कक्षात येणाऱ्या तक्रारी वाढल्याचे दिसते.
जवळपास सर्व तक्रारींचे निवारण
जेवढ्या तक्रारी आलेल्या आहेत त्यापैकी ७५ टक्के तक्रारींचे निवारण झाले आहे. समुपदेशनाने या सर्व तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक कक्षाकडे अनेक जण संपर्क साधत असून त्यांचे समुपदेशन केले जात आहे. संवाद खुंटणे आणि एकमेकांना समजून न घेणे, हेच या सगळ्या तक्रारींचे मुळ आहे. प्राप्त तक्रारीतून हा निष्कर्ष निघाला आहे.
कुटुंबियांकडून दुर्लक्ष
आपण म्हातारे झालो, म्हणजे आता कुटुंबीयांसाठी निरूपयोगी ठरतो आहोत, ही भावना ज्येष्ठांच्या मनात बळावत आहे. कामाचा ताण, सोशल मीडियामुळे स्वत:भोवती निर्माण झालेले आभासी जग यामुळे तरूणाईला आपल्या सभोवतालच्या माणसांचा विसर पडतो. यातूनच संवाद खुंटतो आणि दोन पिढ्यांमध्ये अंतर निर्माण होते. पोलीस आयुक्तालयातील ज्येष्ठ नागरिक कक्षामध्ये फोनद्वारे तक्रारी येण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र लेखी स्वरूपात तक्रार देणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. तक्रार आल्यानंतर जेव्हा समुपदेशनासाठी बोलविले जाते, तेव्हा मुलगा, सून यांच्याकडून टाळाटाळ केली जाते. मुलाने घर बळकावले, माझ्याच घरातून मला बाहेर काढले, आमच्या घरात परके झालो आहोत, सून आमच्याशी बोलत नाही, सून विचारत नाही, घरात आमच्याशी कुणी बोलत नाही, अशा ज्येष्ठांकडून येणाऱ्या तक्रारी अगदीच कौटुंबिक स्वरूपाच्या असतात. बऱ्याचदा एकमेकांमध्ये कमी होत चाललेला संवाद हेच या तक्रारींचे खरे कारण असते. वृद्धांकडूनही काही चुका होत असतील, पण तरूणांनी सामंजस्याने वागणे गरजेचे आहे.