'आम्ही होतो गुलाम, आम्हाला बादशाह बनवून गेला'; आंबेडकर जयंतीत कल्पक होर्डिंग्जने लक्षवेधले
By प्रशांत तेलवाडकर | Published: April 15, 2024 12:51 PM2024-04-15T12:51:09+5:302024-04-15T12:51:09+5:30
होर्डिंग्जचा वापर अशा कल्पक पद्धतीनेही होऊ शकतो, याचे हे उत्तम उदाहरण ठरत आहे.
छत्रपती संभाजीनगर : ‘कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला... फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला... जनावरासारखे होते जीवन, तो माणूस बनवून गेला...आम्ही होतो गुलाम, आम्हाला बादशाह बनवून गेला’... असा भीमसागराच्या अंत:करणातील आवाज होर्डिंग्जवर पाहून प्रत्येकाचे मन अभिमानाने फुलून जात आहे... डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित शहरभर होर्डिंग्ज लावण्यात आले आहे... त्यावरील बाबांसाहेबांची विविध छायाचित्रे व त्यांचा संदेश साऱ्यांना अंतर्मुख करत आहे.
एरव्ही शहरात महापुरुषांच्या जयंतीचे, तर नेत्यांच्या वाढदिवसाचे होर्डिंग्ज लागत असतात. त्यावर खंडीभर कार्यकर्त्यांचे फोटो असतात. मात्र, डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मुख्य चौकात लावण्यात आलेले होर्डिंग्ज चर्चेचा विषय बनले आहेत. भडकल गेट येथे चौकात चारी बाजूंनी होर्डिंग्ज लावण्यात आले असून, त्यातील डाॅ. आंबेडकरांचे सिंहासनावर बसलेले छायाचित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘हजारो वर्षांची परंपरा एकाच सहीने मोडून, जनतेला आपल्या हक्काची जाणीव करून देणाऱ्या युगप्रवर्तकाची जयंती येत आहे’, असे छापण्यात आले आहे. दुसऱ्या होर्डिंग्जवर ‘निसर्ग नियमाप्रमाणे पाणी आग विझवते..पण माझ्या भीमाने तर, पाण्यालाच आग लावली’... तर तिसऱ्या होर्डिंग्जवर ‘माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटलीच तर ती फक्त आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची वाटायला हवी’. हा डॉ. आंबेडकरांचा संदेश आहे. दूध डेअरी चौकातही होर्डिंग्ज बघण्यास मिळत आहे. ‘जर माझ्या भीमरायांचे आयुष्य शतकाच्या पार असते तर प्रत्येक बहुजनांच्या घराला सोन्याचे दार असते’... होर्डिंग्जचा वापर अशा कल्पक पद्धतीनेही होऊ शकतो, याचे हे उत्तम उदाहरण ठरत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ३२ पदव्या
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ३२पदव्या कोणत्या, याची यादीच काही होर्डिंग्जवर देण्यात आली आहे.‘ संपूर्ण आशिया खंडात ज्याने अर्थशास्त्र डबल डॉक्टरेट मिळवली, त्या ज्ञानसूर्याची जयंती’ असा उल्लेख करण्यात आला आहे. तर काही होर्डिंग्ज व डॉ. आंबेडकरांचे संपूर्ण नाव व त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. हेच होर्डिंग्ज यंदाच्या जयंतीचे वैशिष्ट्य ठरत आहे.
विविध भावमुद्रा लक्षवेधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या होर्डिंग्जवरील विविध भावमुद्राही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. सिंहासनावर बसलेले डॉ. आंबेडकर, भारतीय संविधानावर हात ठेवून उभे असलेले डॉ. आंबेडकर, वहीवर लिहीत असताना, डोक्यावर ‘राउंड हॅट’ घालून लोकांचे अभिवादन स्वीकारताना, असे छायाचित्र असलेल्या होर्डिंग्जसोबत अनेकजण सेल्फी काढत आहेत.