'आम्ही फक्त शिकवणार, विद्यापीठाच्या प्रशासकीय कामात असहकार'; प्राध्यापक संघटनेचा इशारा
By योगेश पायघन | Published: August 12, 2022 01:22 PM2022-08-12T13:22:10+5:302022-08-12T13:22:33+5:30
विद्यापीठात द्वारसभा : बामुटा ठरवणार पुढची दिशा, नोटिसांचा निषेध
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १२७ कोटींच्या अनियमितते प्रकरणी चौकशीला वेग आला आहे. त्यात विद्यापीठ प्रशासनाने ७० ते ८० प्राध्यापकांना नोटीसा बजावल्या. तसेच विभागीय चौकशीची तयारी सुरु केल्याने त्याचा निषेध प्राध्यापकांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद पद्युत्तर शिक्षक संघटना (बामुटा) संघटनेने शुक्रवारी प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावर केला.
विद्यापीठातील १२७ अनियमिततेच्या चौकशीसाठी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी स्वतंत्र सेल निर्माण केला. प्र-कुलगुरु , मुख्यलेखा व वित्त अधिकारी आणि विधिज्ञच्या देखरेखीत या समितीने दीडशेहून अधिक महाविद्यालयांच्या सलग्निकरणाची तपासणी केली. तर दुसरीकडे दहा जणांच्या पथकाने दोषारोप निश्चितीकरण करुन ८० प्राध्यापकांना नोटीस बजावल्या. या नोटीसीत वापरण्यात आलेली भाषा आणि दिलेले संदर्भ यावर प्राध्यापकांनी कुलगुरु व प्र-कुलगुरुंकडे रोष व्यक्त करुन या प्रकरणाकडे सहानुभूतीने पाहण्याची विनंती केली. मात्र, त्यातून तोडगा न निघाल्याने अखेर प्राध्यापकांनी असहकार्याची भूमिका शुक्रवारी घेतली.
विद्यार्थ्यांना शिकवू परंतु जे आमचे काम नाही. ते प्रशासकीय काम, समित्यांचे काम यापुढे करणार नाही. अशी भूमिकाही ज्येष्ठ प्राध्यापकांनी मांडून कलंकीत करु नका, अपहार नाही अनियमिततेचा ठपका आहे, अकाऊंट कोड चे उल्लंघन नाही आणि धामणस्कर समितीच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. या द्वारसभेनंतर एक शिष्टमंडळ कुलगुरु व प्र-कुलगुरु यांना भेटून पुढील आंदोलनाची दिशा बामुटा संघटना ठरवणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान दीडतास थांबलेल्या प्राध्यापक आणि पदाधिकाऱ्यांना प्रशासनाच्या वतीने कुणीही भेटले नाही.