‘दहा वर्षांत हवामान अंदाज गावपातळीवर’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 05:24 AM2018-07-09T05:24:07+5:302018-07-09T05:24:38+5:30
सुपर संगणकाची मदत घेण्यात येत असल्याने राज्य, कृषी क्षेत्र, जिल्हा क्षेत्राबरोबर तालुका पातळीवरील हवामान अंदाज वर्तविणे शक्य होत आहे. ही प्रगती पाहता पुढील दहा वर्षांत हवामान विभाग गावपातळीवर पोहोचणार आहे.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद - सुपर संगणकाची मदत घेण्यात येत असल्याने राज्य, कृषी क्षेत्र, जिल्हा क्षेत्राबरोबर तालुका पातळीवरील हवामान अंदाज वर्तविणे शक्य होत आहे. ही प्रगती पाहता पुढील दहा वर्षांत हवामान विभाग गावपातळीवर पोहोचणार आहे. याबरोबर देशभरातील शेतकऱ्यांसाठी ५३० स्वयंचलित हवामान केंद्रही महत्त्वाचे ठरतील, अशी माहिती पुणे येथील हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक डॉ. एन.चटोपाध्याय यांनी ‘लोकमत’ला दिली.
पैठण रोडवरील कृषी विज्ञान केंद्रात लवकरच स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी शनिवारी चटोपाध्याय आणि शास्त्रज्ञांच्या पथकाने जागेची पाहणी केली. गेल्या काही वर्षांत भारतीय हवामानशास्त्र विभागात (आयएमडी) खूप सुधारणा झाली आहे. रडार, उपग्रह आणि अद्ययावत संगणक प्रणालीमुळे मिळणाºया माहितीचे, आकडेवारीचे विश्लेषण करून अचूक अंदाज वर्तविणे शक्य होत आहे. आधी ‘आयएमडी’ स्वत:च काम करीत असे; परंतु आता मेट्रोलॉजिकल कम्युनिटीच्या माध्यमातून इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स, आयआयटी दिल्ली यांसह अनेक संस्था जोडल्या गेल्या आहेत. हवामानाचा योग्य अंदाज पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे ते म्हणाले.