हवामानाचा वेध घेणारे अत्याधुनिक यंत्र कार्यान्वित
By Admin | Published: July 10, 2016 12:40 AM2016-07-10T00:40:46+5:302016-07-10T01:00:01+5:30
औरंगाबाद : औरंगाबाद आणि १० किलोमीटर परिसरातील हवामान व त्यामध्ये होणारे बदल अचूक टिपणारे स्वयंचलित हवामान यंत्र शनिवारी कार्यान्वित झाले.
औरंगाबाद : औरंगाबाद आणि १० किलोमीटर परिसरातील हवामान व त्यामध्ये होणारे बदल अचूक टिपणारे स्वयंचलित हवामान यंत्र शनिवारी कार्यान्वित झाले. महात्मा गांधी मिशनच्या जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या या यंत्राचे लोकार्पण शनिवारी प्रसिद्ध शास्रज्ञ डॉ. निवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या अत्याधुनिक यंत्रणेमुळे शेतकरी संशोधक विद्यार्थी, आपत्ती व्यवस्थापन क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना याचा लाभ होणार आहे.
या केंद्रामुळे सहा तास आधी औरंगाबादमधील हवामानाचा अंदाज वेबसाईटवर कळेल. शिवाय हवामानविषयक १५ मानकांची येथे माहिती मिळू शकेल.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील माहितीची देवाण -घेवाण या केंद्राद्वारे करता येईल. हवामानाच्या बदलाची माहिती घेण्यासाठी आतापर्यंत चिकलठाणा वेधशाळेवर अवलंबून राहावे लागत होते; परंतु आता औरंगाबादसाठी स्वतंत्र असे हवामान केंद्र्र महात्मा गांधी मिशन यांच्या वतीने उपलब्ध झाले आहे.
या यंत्राच्या लोकार्पणानंतर मार्गदर्शन करताना डॉ. निवास पाटील यांनी खगोलशास्त्राचा हवामानाशी संबंध किती महत्त्वाचा आहे, याचे स्पष्टीकरण गणिती समीकरणाद्वारे उलगडून सांगितले.
एकंदरीत विश्वाचा प्रवास कशा प्रकारे झाला आहे, हे आजच्या विज्ञानाशी सांगड घालून त्यांनी माहिती दिली.
सूर्यमालेचे वर्णन, त्यामध्ये होणारे बदल व बदलांच्या परिणामाचा आढावा यावेळेस त्यांनी घेतला. काम करा आणि निरोगी राहा हा महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला. हवेची दिशा, पावसाचे प्रमाण, पुढील बारा तासांचा हवामान अंदाज अतिनील किरणे दवबिंदू इ. घटकांची माहिती पूर्णत: सौरऊर्जेवर चालणाऱ्या या हवामान यंत्राची माहिती खगोलशास्र व अंतराळ तंत्रज्ञान नांदेड केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली.
महात्मा गांधी मिशनचे सचिव अंकुशराव कदम, संस्थेचे विश्वस्त प्रतापराव बोराडे, प्राचार्य सुधीर देशमुख,आशिष गाडेकर, स्थापत्य विभागप्रमुख डॉ. संगीता शिंदे तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.