‘एसटी’च्या चालक-वाहकांना लग्नपत्रिका, रेल्वे तिकीट जोडले तरच मिळते रजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 11:35 AM2019-05-17T11:35:45+5:302019-05-17T11:40:22+5:30
आजारी असल्यास ‘प्रिस्क्रिप्शन’ही जोडावी लागते
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : एसटी महामंडळातील चालक-वाहकांनी एखाद्या कारणासाठी रजा मागितली, तर त्या कारणाचा पुरावा दिल्यानंतरच सुटी मंजूर होते. नातेवाईकांचे असो की, खुद्द स्वत:चे लग्न, आजारापण अशा अनेक कारणांसाठी रजा घेताना पुरावा द्यावा लागतो. त्यामुळे सुटीसाठी रजेच्या अर्जासोबत डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन, रेल्वेचे तिकीट, लग्नपत्रिका, अशा अनेक बाबी जोडण्याची दुर्दैवी वेळ चालक- वाहकांवर येत आहे.
घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान एसटी महामंडळातील चालकाच्या भावाचा १४ मे रोजी मृत्यू झाला. मात्र, अंत्यविधीसाठी सुटी मंजूर करून घेण्यासाठी भावाचा मृतदेह थेट रुग्णवाहिकेने सिडको बसस्थानकात घेऊन येण्याची वेळ चालकावर ओढावली. या घटनेविषयी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांतून हळहळ आणि प्रशासनाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे. एसटी महामंडळाच्या चालक-वाहकांवर ही वेळ का ओढावत आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला. तेव्हा चालक-वाहकांनी एखाद्या कारणासाठी रजा मागितली तर ती मंजूर करून घेण्यासाठी काय करावे लागते, याचा उलगडा झाला.
एखाद्या कारणासाठी सुटी लागत असेल तर चालक-वाहक आगार व्यवस्थापकांकडे अर्ज करतात. अर्ज केल्यानंतर नेमक्या कोणत्या कारणासाठी रजा, सुटी मागितली जात आहे, याची पडताळणी केली जाते. कर्मचाऱ्याने ज्या कारणासाठी सुटी मागितली ते कारण योग्य असेल तरच रजा मंजूर केली जाते. त्यामुळे त्याचा पुरावाच देण्याची वेळ चालक-वाहकांवर येते. नातेवाईकांचे लग्न असेल तर लग्नपत्रिका अर्जासोबत जोडावी लागते. अचानक एखाद्या दिवशी आजारामुळे कामावर गैरहजर राहिल्यास डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनचा पुरावाही द्यावा लागतो. काही कामानिमित्त प्रवास करणे गरजेचे असेल आणि तो प्रवास रेल्वेने होणार असेल तर रेल्वेच्या तिकिटाची प्रत पुरावा म्हणून द्यावी लागते. जे कारण असेल ते खरे असल्याचा एकप्रकारे पुरावाच द्यावा लागत असल्याचे चालक-वाहकांनी सांगितले.
प्रवाशांच्या सेवेत कायम तत्पर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वत:च्या गरजेचे आणि अडचणीच्या वेळेस सुटी मिळविण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अर्जासोबत पुरावा जोडण्याची ही पद्धत कोणत्याही अन्य प्रशासकीय सेवेत नाही. त्यामुळे महामंडळातील ही परिस्थिती दूर करण्याची गरज आहे. अन्यथा यापुढेही एखाद्या कर्मचाऱ्याला सुटीसाठी नातेवाईकाचा मृतदेह दाखविण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
स्वत:च्या लग्नाचीही पत्रिका
चालक-वाहकांना स्वत:च्या लग्नासाठी रजा मिळविण्यासाठी चक्क लग्नाची पत्रिका अर्जासोबत द्यावी लागते. ‘लोकमत’ने पाहणी केली तेव्हा स्वत:च्या लग्नासाठी रजा मिळविण्यासाठी एका कर्मचाऱ्याला अर्जासोबत लग्नपत्रिका जोडावी लागल्याचे आढळून आले. लग्नाची पत्रिका जोडल्यानंतर मोजक्याच सुट्या मिळतात. अवघ्या काही दिवसांत पुन्हा कर्तव्यावर हजर राहण्याच्या अटीवरच रजा मंजूर केली जाते.
अधिक पुष्टी मिळते
रजेसाठी जे कारण अर्जात नमूद केलेले असते, त्या कारणाला अधिक पुष्टी मिळावी, यासाठी चालक-वाहकच लग्नपत्रिका जोडतात. तसे काही त्यांना बंधनकारक नाही. रेल्वेचे तिकीट, डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन अशी काहीही कागदपत्रे जोडण्याची गरज नाही. आजारपणासंदर्भातील सुटीसाठी मेडिकल सर्टिफिकेट द्यावे लागते.
- किशोर सोमवंशी, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ