लग्नातील स्वीटडिशने विषबाधा; बाधितांचा आकडा किरकोळ असल्याचा कदीर मौलाना यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 03:25 PM2023-01-05T15:25:28+5:302023-01-05T15:26:49+5:30
सध्या घाटी रुग्णालयात एकावर तर एमजीएम रुग्णालयात १४ जणांवर उपचार सुरु आहेत.
औरंगाबाद:राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुल कदिर मौलाना यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यानिमित्त बुधवारी रात्री मदनी चौक येथे जेवणाचा कार्यक्रम होता. येथे जेवणानंतर स्वीटडिश खाल्याने रात्रीच अनेकांना उलट्या, मळमळ,जुलाब असा त्रास सुरु झाला. रात्रीतून त्रास जाणवणारे पाहुणे घाटी रुग्णालय आणि एमजीएम रुग्णालयात दाखल झाले. दरम्यान, अनेकांना रात्रीच सुटी देण्यात आली असून दोन्ही रुग्णालयात मिळून सध्या १५ जणांवर उपचार सुरु आहेत.
लग्न समारंभाच्या जेवणातून विषबाधा झाल्याने प्रकृती बिघडून २२ जण घाटी रुग्णालयात तर ४९ जण एमजीएम रुग्णालयात दाखल झाले. काहींना रात्रीच उपचार करून सुटी देण्यात आली. सध्या घाटी रुग्णालयात एकावर तर एमजीएम रुग्णालयात १४ जणांवर उपचार सुरु आहेत. उपचार सुरु असलेल्यांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. जेवणानंतर स्वीटडिश खाल्यानंतर त्रास सुरु झाल्याचे बाधीतांनी सांगितले. दरम्यान, याबाबत अनेक अफवा सकाळपासून शहरात पसरल्या होत्या. चारशे ते सातशे जणांना विषबाधा झाल्याचे बोलले जात होते. मात्र, कदीर मौलाना यांनी यावर स्पष्टीकरण देत बाधितांचा आकडा फुगवून सांगण्यात येत असल्याचा आरोप केला. तसेच उपचार सुरु असलेल्यांचा आकडा किरकोळ असल्याचा दावा ही त्यांनी केला आहे.
आकडा फुगवून सांगितला जात आहे
दहा बारा लोकांना जेवणानंतर उलट्या झाल्या. ते उपचारार्थ एमजीजममध्ये दाखल झाल्यानंतर मी स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो. दोघे तिघे घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. यापेक्षा ही घटना मोठी नाही. पाचशे वा सातशे जणांना विषबाधा झाली, हे धादांत खोटे आहे. यात काही काळेबेरे आहे का, कुणी घडवून आणले का, असे मी आताच म्हणू शकत नाही.
- कदीर मौलाना, राष्ट्रवादी काँग्रेस