आठवडाभरापासून सोयगाव आगारातून लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या अचानक रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 07:47 PM2019-02-28T19:47:31+5:302019-02-28T19:48:41+5:30
विद्यार्थी आणि प्रवास्यांची कोंडी झाली आहे.
सोयगाव (औरंगाबाद ) : आठवडाभरापासून येथील आगारातील लांबपल्ल्याच्या बस अचानक रद्द होत आहेत. यामुळे तालुक्यातील विद्यार्थी आणि प्रवास्यांची कोंडी झाली आहे.
सोयगाव आगाराकडे मनुष्यबळ कमी असल्याने,सातत्याने बसफेऱ्या रद्द करण्याची नामुष्की आगारावर आली असल्याची माहिती आहे. परीक्षा, लग्न सराई आणि दुष्काळ यामुळे तालुक्यातून मोठ्याप्रमाणावर प्रवासी बसने बाहेर पडत आहेत. यातच ऐनवेळी बसफेऱ्या रद्द होत असल्याने प्रवाशांना ऐनवेळी खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. यामुळे परीक्षा काळात विद्यार्थ्यांची मोठी कोंडी होत आहे.
बुधवारी आणि गुरुवारी जवळपास आठ बसफेऱ्या रद्द झाल्या आहेत. यात पाचोरा,चाळीसगाव,मालेगाव,धुळे येथे जाणाऱ्या बस नियमित रद्द होत आहेत. आगारप्रमुखांनी बसफेऱ्या नियमित करण्याची मागणी विद्यार्थी आणि प्रवास्यांनी केली आहे.