करमाडच्या आठवडी बाजारावर दुष्काळाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 08:44 PM2019-08-26T20:44:11+5:302019-08-26T20:44:55+5:30
सोमवारी भरलेल्या करमाडच्या बाजारात तब्बल ३० ते ४० टक्के विक्री कमी झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
शेंद्रा : दुष्काळाचा परिणाम पोळा सणावर दिसून येत असून, सोमवारी भरलेल्या करमाडच्या बाजारात तब्बल ३० ते ४० टक्के विक्री कमी झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. यावरुन दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याचे दिसून येत आहे.
शेती, पशुधन आणि शेतकरी यांचे अतूट नाते आहे. यांत्रिकीकरण झाले असले तरी अजूनही पशुधनाचे महत्त्व कमी झालेले नाही. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सिंहाचा वाटा असणारा त्याच्या परिवारातील सदस्य म्हणून बैलाची ओळख आहे. अशा बैलाची पुज्याकरून ऋण फेडण्याचे काम पोळा सणाच्या निमित्ताने शेतकरी करतात. या सणानिमित्त बैलांना सजविण्यात येते.
यासाठी शेतकरी विविध साहित्य खरेदीसाठी गर्दी करतात. परिसरातील ३० गावांतील शेतकरी करमाडच्या आठवडी बाजरातून बैलांना सजवण्याचे साहित्य खरेदी करतात. परंतु यावर्षीच्या आठवडी बाजारात शेतकºयांनी साहित्य खरेदीस हात आखडता घेतल्याचे दिसत आहे. ईच्छा असूनसुद्धा पैशांअभावी ही परिस्थिती शेतकºयांवर ओढवली आहे. सोमवारी भरलेल्या आठवडी बाजारात ३० ते ४० टक्के विक्री कमी झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
व्यापाºयांनी बैलांच्या शिंगाला लावण्यासाठी आॅइल पेंटचे कलर , चमचमीत बेगडे , गळ्यात घालण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या घागरमाळा, बाशिंग , घुंगरू, गोंडे , घंट्या, ताग, सुती आदी वस्तू विक्रीसाठी आणल्या होत्या. परंतु याची विक्रीच समाधानकारक झाली नसल्याचे व्यापाºयांनी सांगितले.
बैलांना धुण्यासाठी टँकरचे पाणी
औरंगाबाद तालुक्यात शेकटा, देमणी वाहेगाव, कवडगाव , गोलटगाव अशा अनेक गावांतील तलावात, विहरित थेंबही पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे बैलांना धुण्यासाठी टँकरने विकत पाणी आणावे लागणार आहे.