साप्ताहिक राशिभविष्य
By | Published: December 6, 2020 04:00 AM2020-12-06T04:00:18+5:302020-12-06T04:00:18+5:30
डॉ. मनीषा देशपांडे, औरंगाबाद साप्ताहिक राशिभविष्य दि. ६ ते १२ डिसेंबर २०२० डॉ. मनीषा देशपांडे, औरंगाबाद या आठवड्यातील ग्रहस्थिती ...
डॉ. मनीषा देशपांडे, औरंगाबाद
साप्ताहिक राशिभविष्य
दि. ६ ते १२ डिसेंबर २०२०
डॉ. मनीषा देशपांडे, औरंगाबाद
या आठवड्यातील ग्रहस्थिती अशी-
वृश्चिक राशीत रवी, केतू व बुध असतील. मीन राशीत मंगळ, तर मकर राशीत गुरू आणि शनी असतील. कुंभ राशीत नेपच्यून, मेष राशीत हर्षल, धनू राशीत प्लुटो, तर वृषभ राशीत राहू असेल. चंद्राचे भ्रमण सिंह, कन्या आणि तूळ राशीतून असेल.
मेष :
अन्नपूर्णा प्रसन्न राहील :
कामाचा ताण कमी झाला आहे. रोजचे रुटीन पण सेट झाले आहे. महालक्ष्मी पण प्रसन्न राहील. त्यामुळे या आठवड्यात मनासारखे भरपूर खाण्यास मिळेल. काहींना एखाद्या कार्यक्रमात भाग घेता येईल. मुलांचा ताण पण कमी होईल. काहींना परीक्षा द्यावी लागेल. सामाजिक कामात वादावादी होईल; पण शेवटी सर्वमान्य निर्णय घेतला जाईल. महिलावर्ग उत्साहात बरीच कामे घेईल; पण थकवा जाणवेल. गाडी सांभाळून चालवा.
टीप- मंगळवार, बुधवार व गुरुवार चांगले दिवस.
वृषभ :
मुलांचे मित्र बनाल :
व्यापारात भरपूर काम वाढेल, तसेच नोकरीत पण नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. काहींना त्याचा ताण पण येईल. त्यातून बाहेर पडण्यासाठी मुलांचे मित्र बना. त्यांचा सल्ला घ्या. त्यांना त्यांचे मत मांडू द्या. त्यांच्याबरोबर वेळ व्यतीत केल्यामुळे तुमचा ताण कमी होईल. महिलावर्गाला नियोजनात काही बदल करावा लागेल. विद्यार्थ्यांना गुरुजनांची मदत मिळेल. तंत्रशिक्षण घेणाऱ्या मुलांना जास्त अभ्यास करावा लागेल. एकूण काळ हसत-खेळत मजेत जाईल.
टीप- सोमवार, मंगळवार व गुरुवार चांगला दिवस.
मिथुन :
आर्थिक नियोजन करा :
मागील वर्षभर आर्थिक स्थिती वर-खाली होत होती. बराचसा खर्च झाला आहे; पण आता परिस्थिती आटोक्यात येत आहे. तेव्हा आर्थिक नियोजन करा. भविष्याच्या काही विशेष योजना असतील तर त्या पूर्ण करा. घरातील भगिनींनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी. मानसिक ताण असल्यास बोलून दूर करावा. व्यापारीवर्गाला नवीन मालक भरावा लागेल. नवीन विषयावर भर द्यावा लागेल. एकूणच नीट नियोजन व बोलून ताण कमी केल्यास आठवडा चांगला जाईल.
टीप- बुधवार व गुरुवार चांगले दिवस.
कर्क :
बहिणीसाठी वेळ द्यावा लागेल :
नोकरीत अपेक्षित बदल होतील. काही जबाबदाऱ्या कमी होतील, तसेच काही व्यापारात तेजी, तर काहीत मंदी राहील. भिशी किंवा लकी ड्रॉसारख्या कामात नशीब साथ देईल. काहींना बहिणीसाठी वेळ द्यावा लागेल. काहींना आर्थिक मदत पण करावी लागेल. महिलावर्गाला नवीन शिकण्याचा व नवीन काम सुरू करण्यासाठी चांगला काळ आहे. विद्यार्थी वर्गाला गणितासारख्या विषयाची गोडी लागेल. अभ्यासात रुची वाढल्याने घरची मंडळी खुश होतील. एकूणच घरात आनंद नांदेल.
टीप- सोमवार, मंगळवार व बुधवार चांगले दिवस.
सिंह :
स्वतःला सिद्ध कराल :
काही घरांत तब्येतीची कुरबुर चालू राहील. मुले आणि मोठ्यांना त्रास होईल. तुमच्या समोर आलेल्या प्रत्येक आव्हानाला शांतपणे तोंड द्याल. स्वतःला यशस्वी सिद्ध कराल. बरेच दिवस चाललेले आर्थिक प्रश्न पण सुटतील. घरात ज्येष्ठांचा सल्ला ऐकावा लागेल. महिला काहीशा कामाच्या ताणात असतील. नोकरीतील जबाबदारी वाढेल. व्यापारीवर्गाला स्थिर आठवडा जाईल. मुलांचा कल ‘खाओ, पिओ, ऐश करो’ असा राहील.
टीप- मंगळवार, बुधवार व शनिवार चांगले दिवस.
कन्या :
आनंद देणारा काळ :
तुमचा स्वभाव मनाला खूप लावून घेणारा नाही. बोलून आपण मोकळे होता, तसेच या काळात होईल. परिणामी, सप्ताह आनंदात जाईल. मनासारखे फिरता येईल. खाता येईल. नोकरदार वर्गाला कामाचा ताण राहणार नाही. व्यापारीवर्ग आर्थिक लाभ झाल्यामुळे खुशीची गाजरे खाईल. मित्र भेटतील. महिलांना वेळोवेळी राग अनावर होईल. काही न पटणाऱ्या गोष्टी घडतील. उच्चशिक्षण घेणाऱ्यांना मेहनत अधिक वाढवावी लागेल. बाकी विद्यार्थ्यांना सामान्य काळ आहे.
टीप- बुधवार, गुरुवार व शुक्रवार चांगले दिवस.
तूळ :
वडीलधाऱ्यांचा सल्ला मोलाचा.
ऋतू बदलामुळे सुरुवातीला काही त्रास जाणवेल. थोडी काळजी घेतली, तर विशेष त्रास होणार नाही. ज्येष्ठांकडून मिळालेला सल्ला तुमचे अनेक प्रश्न सोडवील. आर्थिक घडी नीट बसेल. घर, जमीन घेण्याच्या विचारात असाल, तर यश मिळेल. आर्थिक गुंतवणूक पण लाभ देईल. रोजच्या वस्तूंचा व्यापार करणाऱ्यांना चांगला काळ, तसेच सरकारी व निमसरकारी काम करणाऱ्यांना दिलासा मिळेल. महिलावर्गाला खरेदीचा काळ आहे. बच्चेकंपनी आनंदात असेल.
टीप- गुरुवार, शुक्रवार व शनिवार चांगले दिवस.
वृश्चिक :
सरकारी कामे होतील :
सरकारी मंजुरी किंवा काही पत्र हवे असेल, तर हा उत्तम काळ आहे. स्पर्धा परीक्षा, मुलाखती यामध्ये यश मिळेल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. काहींचे कौतुक होईल. व्यापाऱ्यांना सरकारी नियम पाळावे लागतील. सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होतील. त्यामुळे ते पुन्हा कामाला लागतील. महिलावर्गाला सामान्य काळ आहे. काहींच्या कामात अडचणी येऊ शकतात. तुमच्या हुशारीने प्रश्न सोडवाल.
टीप- बुधवार, गुरुवार व शुक्रवार चांगले दिवस.
धनू :
घरातील वाद संपतील :
काही वाद व भांडण यातून सुरू झालेला सप्ताह शेवटी वाद संपून निवळेल. शांतपणे विचार करण्याची वेळ आहे. रागाच्या भरात गैरसमज करून घेऊन वाद वाढवू नका. काहींना कामानिमित्त प्रवास करावा लागणार आहे. प्रवास यशस्वी होईल. महिलावर्गाला आपले म्हणणे पटवून द्यावे लागेल. काहींना माहेरी जाण्यासाठी प्रवास करावा लागेल. माहेरी कौतुक झाल्याने महिला सुखावतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत अपेक्षित यश मिळेल. काही घरांत धार्मिक कार्यक्रम होतील.
टीप- शुक्रवार व शनिवार चांगले दिवस.
मकर :
माहेरून भेटवस्तू मिळेल :
व्यापारीवर्गाला चांगला काळ आहे. मनासारखा व्यवसाय होईल. नोकरदारांना पण कामात यश मिळेल. काहींना त्यांचे लक्ष्य पूर्ण करण्याचे श्रेय मिळेल. विद्यार्थ्यांना तब्येतीकडे लक्ष द्यावे लागेल. काही विद्यार्थी तणावात असतील. त्यांनी बोलून ताण कमी करावा. पैसे वसूल त्रास होण्याची शक्यता आहे. काहींना कोर्टबाजी पण करावी लागेल. महिलावर्गाला उत्तम काळ आहे. माहेरी जाण्याचे योग आहेत, तसेच तिथे कौतुक होईल. भेटवस्तू पण मिळेल.
टीप- बुधवार, गुरुवार उत्तम दिवस.
कुंभ :
चांगली बातमी मिळेल :
ज्या घरात मंगल कार्यासाठी प्रयत्न चालू आहेत, त्यांना चांगली बातमी मिळेल. प्रेम करणाऱ्यांना पण जोडीदाराची साथ मिळेल. व्यापारीवर्गाला एखाद्या वादाला तोंड द्यावे लागेल, तसेच घरातील ज्येष्ठांची पण काळजी घ्यावी लागेल. बोलताना कठोर शब्द वापरू नका; अन्यथा तुमच्या मेहनतीवर पाणी फिरेल. महिलावर्गाला चांगला काळ आहे. काहींना पाहुण्यांसाठी वेळ द्यावा लागेल. कला क्षेत्राशी संबंधित विद्यार्थ्यांना यश मिळेल.
टीप- सोमवार, शुक्रवार व शनिवार चांगले दिवस.
मीन :
शत्रूवर मात कराल :
गरम डोक्याने कोणताही निर्णय घेऊ नका. एकेरी विचार करू नका. तुम्ही आपल्या मेहनतीने शत्रूवर मात कराल. व्यापारीवर्गाला अचानक लाभ मिळेल. प्रवासात तब्येतीची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासाठी नियोजन करावे लागेल. काहींना त्यात अडचणी येऊ शकतात. परदेशात काम करणाऱ्यांना काहींना येथे जमीन किंवा घरासाठी पैसे गुंतवता येतील. महिलांना मनासारखी खरेदी करता येईल.
टीप- बुधवार, गुरुवार व शुक्रवार चांगले दिवस.