कोरोनाच्या ९ महिन्यांनंतर साप्ताहिक रेल्वे येणार रुळांवर
By | Published: December 4, 2020 04:04 AM2020-12-04T04:04:48+5:302020-12-04T04:04:48+5:30
औरंगाबाद : कोरोना विळख्याच्या ९ महिन्यांनंतर औरंगाबादमार्गे धावणाऱ्या साप्ताहिक, द्विसाप्ताहिक आणि त्रि-साप्ताहिक रेल्वे रुळावर येणार आहे. हैदराबाद-जयपूर, सिकंदराबाद-शिर्डी, काकिनाडा-शिर्डी ...
औरंगाबाद : कोरोना विळख्याच्या ९ महिन्यांनंतर औरंगाबादमार्गे धावणाऱ्या साप्ताहिक, द्विसाप्ताहिक आणि त्रि-साप्ताहिक रेल्वे रुळावर येणार आहे. हैदराबाद-जयपूर, सिकंदराबाद-शिर्डी, काकिनाडा-शिर्डी रेल्वे सुरू करण्यात येत असल्याची माहिती ‘दमरे’च्या नांदेड विभागाने दिली.
हैदराबाद-जयपूर साप्ताहिक विशेष रेल्वे ५ डिसेंबरपासून दर शनिवारी हैदराबादहून दुपारी ३.१० वाजता सुटेल आणि नांदेड, परभणी, औरंगाबाद, मनमाडमार्गे जयपूर येथे सकाळी ५.२५ वाजता पोहोचेल.
जयपूर-हैदराबाद साप्ताहिक विशेष रेल्वे ८ डिसेंबरपासून दर मंगळवारी जयपूरहून दुपारी ३.२० वाजता सुटेल आणि मनमाड, औरंगाबाद, नांदेडमार्गे हैदराबाद येथे सकाळी ७.३० वाजता पोहोचेल.
तसेच सिकंदराबाद-श्री साईनगर शिर्डी द्वी-साप्ताहिक विशेष रेल्वे ४ डिसेंबरपासून सिकंदराबादहून दर शुक्रवारी आणि रविवारी दुपारी ४.४५ वाजता सुटेल. विकाराबाद, उदगीर, परळी, परभणी, औरंगाबाद, नगरसोलमार्गे श्री साईनगर शिर्डी येथे सकाळी ९.१० वाजता पोहोचेल. श्री साईनगर शिर्डी- सिकंदराबाद द्वी-साप्ताहिक विशेष रेल्वे ५ डिसेंबर रोजी श्री साईनगर शिर्डीवरून दर शनिवारी आणि सोमवारी सायंकाळी ५.२० वाजता सुटेल आणि औरंगाबाद, परभणी, परळी, उदगीरमार्गे सिकंदराबाद येथे सकाळी ८.५५ वाजता पोहोचेल.
साईभक्तांची सुविधा
काकिनाडा-श्री साईनगर शिर्डी त्री-साप्ताहिक विशेष रेल्वे काकिनाडाहून ५ डिसेंबरपासून दर सोमवारी बुधवारी आणि शनिवारी सकाळी ६ वाजता सुटेल, राजमुंद्री, विजयवाडा, सिकंदराबाद, विकाराबाद, परळी, परभणी, औरंगाबादमार्गे श्री साईनगर शिर्डी येथे सकाळी ९.१० वाजता पोहोचेल, तर श्री साईनगर शिर्डी-काकिनाडा-त्री-साप्ताहिक विशेष रेल्वे शिर्डी रेल्वेस्थानकावरून ६ डिसेंबरपासून दर मंगळवारी-गुरुवारी आणि रविवारी सायंकाळी ५.२० वाजता सुटेल, औरंगाबाद, परभणी, सिकंदराबाद, विजयवाडामार्गे काकिनाडा येथे रात्री ७.४५ वाजता पोहोचेल.