शहरात आठवड्याला पाणीपुरवठा, हे खेदजनक; राज्यपालांकडे मांडली अनेकांनी कैफियत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2022 07:43 PM2022-02-04T19:43:00+5:302022-02-04T19:43:19+5:30

१६८० कोटींतून पाणीपुरवठा योजनेचे काम धिम्या गतीने सुरू असून, याबाबत राज्य शासनाशी बोलणार असल्याचे राज्यपालांनी नमूद केले

Weekly water supply in the city, it's unfortunate; Many made representations to the Governor | शहरात आठवड्याला पाणीपुरवठा, हे खेदजनक; राज्यपालांकडे मांडली अनेकांनी कैफियत

शहरात आठवड्याला पाणीपुरवठा, हे खेदजनक; राज्यपालांकडे मांडली अनेकांनी कैफियत

googlenewsNext

औरंगाबाद : मराठवाड्याची आणि पर्यटनाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराला आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी खेद व्यक्त केला. त्यांना शहरातील काही लोकप्रतिनिधी, नागरिकांचे शिष्टमंडळ भेटले. १६८० कोटींतून पाणीपुरवठा योजनेचे काम धिम्या गतीने सुरू असून, याबाबत राज्य शासनाशी बोलणार असल्याचे राज्यपालांनी नमूद केले. तसेच केंद्र शासनानेही यात लक्ष घालावे, यासाठीही राज्यपाल पत्रव्यवहार करणार आहेत.

गुरुवारी राज्यपाल कोश्यारी यांचे शहरात आगमन झाले. विमानतळावर त्यांचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे, आ. हरिभाऊ बागडे, आ. अतुल सावे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी स्वागत केले. नंतर राज्यपालांनी सुभेदारी विश्रामगृहात रेड क्रॉस सोसायटी, जिल्हा सैनिक कल्याण मंडळ आणि मराठवाडा वैधानिक विकास मंडळ, मानव विकास मिशन विभागाची बैठक घेतली. त्यांना भाजपचे शिष्टमंडळही भेटले. शिष्टमंडळाने शहरातील पाणीपुरवठा योजना, महिला सुरक्षा या मुद्द्यांबाबत निवेदन दिले.

औरंगाबादला जागतिक पातळीवर महत्त्व आहे ते पर्यटनस्थळांमुळे. त्यात वेरूळ, अजिंठा, औरंगाबाद लेण्यांसह इतर पर्यटनस्थळांचे मोठे नाव आहे. जगभर ख्याती असलेल्या शहराला आठ-आठ दिवसांनी पाणीपुरवठा होणे खेदजनक असल्याची भावना राज्यपालांनी व्यक्त केली. येथील लोकप्रतिनिधी, सरकारमधील मंत्री काय करीत आहेत? त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे राज्यपाल म्हणाले.जिल्हाधिकारी चव्हाण यांनी, जिल्ह्यात राबविलेल्या उपक्रमांचे सादरीकरण राज्यपालांसमोर केले. यात इको बटालियन, वृक्षारोपण कार्यक्रमांचा समावेश होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरदेखील राज्यपालांनी माहिती घेतली. शुक्रवारी सकाळी राज्यपाल सिंदखेड राजा येथे जिजाऊ सृष्टीला भेट देणार आहेत.

घरकुल योजनेला मिळेना जागा
पंतप्रधान आवास योजनेला जिल्हा आणि मनपा प्रशासनातील बेबनावामुळे जागा मिळत नसल्यामुळे ही योजना रेंगाळली आहे. शहरात महिला अत्याचारात वाढ झाल्याची तक्रार भाजपचे आ. सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर, राजू शिंदे, लता दलाल, अमृता पालोदकर, माधुरी अदवंत यांनी राज्यपालांकडे निवेदनाद्वारे केली. तसेच शहर पाणीपुरवठा योजनेचे काम मंद गतीने सुरू असल्याची तक्रारही या शिष्टमंडळाने केली. घरकुल योजनेबाबत राज्यपाल सरकारशी पत्रव्यवहार करणार असल्याचे आ. सावेंनी सांगितले.

Web Title: Weekly water supply in the city, it's unfortunate; Many made representations to the Governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.