२५ कोटी रुपये प्रति किलोमीटर खर्च झालेल्या औरंगाबाद, जालन्यातील समृध्दीसाठी वेट ॲण्ड वॉच
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 06:37 PM2022-04-27T18:37:27+5:302022-04-27T18:38:51+5:30
समृध्दी महामार्गाच्या औरंगाबाद ते जालना जिल्ह्यातील १५४ कि.मी.च्या अंतरात ३९०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे
औरंगाबाद : औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील १५४ कि.मी. अंतरातील समृध्दी महामार्ग वाहतुकीला खुला होण्यासाठी नागरिकांना वाट पाहावी लागणार आहे. नागपूर ते सेलू बाजार (जि. वाशिम)पर्यंतचे लोकार्पण लांबणीवर पडल्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील महामार्गाचे राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी मुदत मिळाली आहे. सावंगी-हर्सूल इंटरचेंज वगळता महामार्गाचे काम पूर्ण होत आले असून १ जुलैपर्यंत ते संपेल, असा दावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ सूत्रांनी केला.
एल ॲण्ड टी या कंत्राटदार कंपनीकडील काम पूर्ण झाले आहे. १ हजार ९०० कोटी रुपयांचे काम या कंपनीकडे होते. तर मेघा कन्स्ट्रक्शन्स कंपनीकडे अंदाजे २ हजार कोटींचे काम होते, त्यातील इंटरचेंजचे काम पूर्ण करणे बाकी आहे. वैजापूरपर्यंतचे काम औरंगाबाद जिल्ह्यात आहे. ११२ कि.मी.पर्यंतचा रस्ता औरंगाबाद जिल्ह्यातून आहे. उर्वरित जालना जिल्ह्यात आहे.
२५ कोटी प्रति किलोमीटरचा खर्च
समृध्दी महामार्गाच्या औरंगाबाद ते जालना जिल्ह्यातील १५४ कि.मी.च्या अंतरात ३९०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून, २५ कोटी रुपये प्रति किलोमीटरचा खर्च या महामार्गाच्या बांधणीवर झाला आहे. हर्सूल-सावंगी येथील इंटरचेंज वगळता बाकीचे काम पूर्ण झाले असून, या दोन्ही जिल्ह्यांतील महामार्ग लोकार्पणासाठी तयार असल्याचे सूत्रांनी सांगितले. नागपूर ते वाशिमपर्यंतचे लाेकार्पण लांबणीवर पडल्यामुळे इंटरचेंजचे काम करण्यास वेळ मिळाला आहे.
पूर्ण महामार्ग तपासणार
महामार्गासाठी सर्वंकष समिती आहे. वाहनांसाठी १५० कि.मी. ताशी वेगाची परवानगी या मार्गावर आहे. ७१० पैकी ४०७ कि.मी.चा मार्ग वाहतुकीसाठी तयार आहे. यासाठी समिती पूर्ण अंगाने स्ट्रक्चर तपासणी करील. याला दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता १०० टक्के काम पूर्ण झाल्यावरच मार्ग वाहतुकीला खुला होईल, असे बोलले जात आहे.