औरंगाबाद जिल्ह्यातील ३ लाख ४४ हजार विद्यार्थ्यांचे वजन कमी; शाळांमध्ये होणार ‘खिचडी’ची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 04:51 PM2018-12-04T16:51:31+5:302018-12-04T16:57:58+5:30
शाळांमध्ये रोज पोषण आहार दिला जातो, तर मग ३ लाख ४४ हजार २३५ विद्यार्थ्यांचे वजन सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा कमी कसे
- विजय सरवदे
औरंगाबाद : शाळांमध्ये रोज पोषण आहार दिला जातो, तर मग जिल्ह्यातील ४ लाख ८० हजार ५८३ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ३ लाख ४४ हजार २३५ विद्यार्थ्यांचे वजन सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा कमी कसे, हा प्रश्न या योजनेच्या अंमलबजावणीवरच उपस्थित करणारा आहे.
शालेय पोषण आहार योजनेचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांचे पथक ३ ते १० डिसेंबरदरम्यान राज्यातील शाळांना अचानक भेटी देणार आहे. या पथकात डॉ. उमा अय्यर, जी. विजया भास्कर, डॉ. स्वाती धु्रुव, सुनील चौहान, डॉ. यास्मीन अली हक, भूपेंद्र कुमार, दिनेश प्रधान, डॉ. श्रुती कंटावाला, श्वेता पटेल, दिव्या पटेल आणि मयुरी राणे आदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पथकातील काही अधिकारी ५, ६ डिसेंबर यापैकी कोणत्याही दिवशी औरंगाबाद जिल्ह्यातील मध्यान्ह भोजन योजना राबविणाऱ्या कोणत्याही शाळांना अचानक भेटी देऊन तपासणी केली जाणार आहे. त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे अधिकारीही असतील; पण त्यांच्यापासूनही शाळा भेटीच्या कार्यक्रमाची संपूर्ण गुप्तता पाळली जाणार आहे.
हे पथक शाळांमध्ये शालेय पोषण योजना लाभदायी आहे का, शाळांमध्ये सकस, सात्त्विक, पौष्टिक व पुरेसे मध्यान्ह भोजन दिले जाते का, मध्यान्ह भोजनामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारले आहे का, पुरवठादारांकडून तांदळाचा योग्य पुरवठा होतो का, या व इतर बाबींच्या उत्तरांसाठी आता गुरुजींना तयार राहावे लागणार आहे. केंद्र सरकारी अधिकाऱ्यांच्या पथकांमार्फत शालेय पोषण आहार योजनेचे रेकॉर्ड, शिजविण्याचे ठिकाण, भांडी, स्वच्छता, मध्यान्ह भोजन निकषानुसार शिजविले जाते का, त्यामध्ये ठरवून दिलेल्या अन्न घटकांचा समावेश केला जातो का, पुरवठादारांमार्फत शाळांपर्यंत तांदूळ व धान्यादी मालाचा पुरवठा होतो का, शाळांमध्ये तांदूळ व धान्यादी मालाची निगा राखली जाते का, किती मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली, किती मुलांची प्रकृती खराब आहे, किती मुले गंभीर आजारी आहेत, यासह अनेक बाबींचा आढावा घेतला जाणार आहे.
जिल्ह्यातील ६ हजार ६४ शाळांपैकी ३ हजार २७ शाळांमध्ये खिचडी
जिल्ह्यातील एकूण ६ हजार ६४ शाळांपैकी ३ हजार २७ शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते. या शाळांतील इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत २ लाख ९५ हजार १८६ विद्यार्थी, तर इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत १ लाख ८५ हजार ३४७ विद्यार्थी, असे एकूण ४ लाख ८० हजार ५८३ विद्यार्थ्यांना रोज पोषण आहार (खिचडी) दिला जातो. पोषण आहार घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली तेव्हा तब्बल ३ लाख ४४ हजार २३५ विद्यार्थ्यांचे वजन जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिलेल्या शरीर वस्तुमान निर्देशांकापेक्षा (बीएमआय) कमी अर्थात एवढी मुले कमी वजनाची आढळून आली आहेत. १ लाख ३४ हजार ५३६ विद्यार्थ्यांचे सामान्य व १ हजार ८१२ विद्यार्थ्यांचे सामान्य वजनापेक्षा अधिक वजनाची आढळून आली आहेत. ७३ विद्यार्थी गंभीर आजारी, तर ४४० विद्यार्थ्यांमध्ये दृष्टिदोष असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे शालेय पोषण आहार योजनेचे वरिष्ठ लेखाधिकारी राजेंद्र खाजेकर यांनी सांगितले.