स्वागत अन् विसर्जनही ‘दणक्यात’च!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 12:53 AM2017-09-05T00:53:20+5:302017-09-05T00:53:20+5:30
अकरा दिवस मुक्कामी असलेल्या लाडक्या बाप्पाला बाराव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी निरोप दिला जाणार आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : अकरा दिवस मुक्कामी असलेल्या लाडक्या बाप्पाला बाराव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी निरोप दिला जाणार आहे. त्या दृष्टीने प्रशासनासह गणेश मंडळाचे नियोजन पूर्ण झाले असून, ते विसर्जनासाठी सज्ज झाले आहेत. परंतु, स्वागत अन् विसर्जनही रस्त्यावरील खड्ड्यांतून होणार असल्याने भाविकांत नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे खड्डे बुजविण्याचा खटाटोप, आवाहन केवळ कागदोपत्री असल्याचेच दिसून येत आहे.
२५ आॅगस्ट रोजी गणरायाचे हर्षोल्हासात आगमन झाले होते. यावर्षी गणराय वरुणराजासोबत आले. त्यामुळे सर्वत्र आनंदीआनंद व्यक्त करण्यात आला. या अकरा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी, अतिवृष्टी, रिमझिम पावसाने लावलेल्या हजेरीमुळे नदी-नाले, ओढे, तलाव, लघु-मध्यम प्रकल्प पाण्याने भरले. तसेच पिकांनाही दिलासा मिळाल्याने बळीराजाही सुखावला आहे. या सर्व परिस्थितीमुळे यंदाचा गणेशोत्सव उत्साहात, जल्लोषात साजरा झाला.
दरम्यान, यंदा जिल्ह्यात १२४१ ठिकाणी बाप्पांची प्रतिष्ठापना झाली आहे. ४९ गावांमध्ये ‘एक गाव दोन गणपती’, तर ३४९ गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात आली. एका ठिकाणी ‘दोन गाव एक गणपती’ बसविण्यात आला.
डीजेवर मिरवणुकीत बंदी असल्यामुळे पारंपरिक वाद्यांचे दर्शन सर्वसामान्यांना घडणार आहे. हा उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.